24
कराराची पुष्टी
1मग याहवेहने मोशेला म्हटले, “तू आणि अहरोन, नादाब आणि अबीहू व इस्राएलींचे सत्तर वडील याहवेहकडे वर या. तुम्ही दुरूनच उपासना करावी, 2परंतु मोशेने एकटेच याहवेहजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये. लोकांनी त्यांच्याबरोबर वर येऊ नये.”
3मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.” 4मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले.
दुसर्या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले. 5मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्हे अर्पून शांत्यर्पण केले. 6मोशेने त्यातील अर्धे रक्त वाटीत घेतले व अर्धे वेदीवर शिंपडले. 7मग मोशेने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांपुढे वाचला. त्यांनी प्रतिसाद दिला, “याहवेहने सांगितले ते सर्वकाही आम्ही करू; आम्ही आज्ञापालन करू.”
8मग मोशेने रक्त घेतले, लोकांवर शिंपडले आणि म्हणाला, “हे कराराचे रक्त आहे, जो याहवेहने त्यांच्या वचनानुसार तुमच्याबरोबर केला आहे.”
9मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले. 10आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते. 11परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.
12मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू पर्वतावर माझ्याकडे ये आणि येथेच राहा आणि लोकांसाठी सूचना म्हणून नियम आणि आज्ञा ज्या मी दगडी पाट्यांवर लिहिल्या आहेत त्या मी तुला देईन.”
13मग मोशे व त्याचा मदतनीस यहोशुआ उठले आणि मोशे पर्वतावर परमेश्वराकडे गेला. 14तो वडीलजनांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत येथेच थांबा, जर कोणाचा काही वाद असला तर त्यांनी अहरोन आणि हूर तुमच्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जावे.”
15जेव्हा मोशे पर्वतावर गेला, मेघांनी पर्वत झाकून गेले, 16आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला. 17इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्या अग्नीप्रमाणे दिसले. 18मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.