YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 35

35
शब्बाथाचे नियम
1मग मोशेने इस्राएली लोकांच्या संपूर्ण समुदायाला बोलाविले व त्यांना म्हटले, “ज्यागोष्टी तुम्ही कराव्या अशी याहवेहनी आज्ञा दिली आहे, त्या या आहेत: 2सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातवा दिवस तुमचा पवित्र दिवस असेल, हा याहवेहप्रीत्यर्थ शब्बाथ विसाव्याचा दिवस असावा. जो कोणी या दिवशी काम करेल, त्याला जिवे मारावे. 3शब्बाथ दिवशी तुमच्या कोणत्याही घरामध्ये विस्तव पेटवू नये.”
निवासमंडपासाठी सामुग्री
4मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे: 5तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे:
“सोने चांदी आणि कास्य,
6निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग;
बोकडाचे केस;
7लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म#35:7 मूळ भाषेत तहशाची कातडी;
बाभळीचे लाकूड;
8दिव्यासाठी जैतुनाचे तेल;
अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
9एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
10“तुमच्यामध्ये जे सर्व कुशल कारागीर आहेत, त्यांनी येऊन जे सर्वकाही याहवेहने आज्ञापिले आहे ते तयार करावे:
11“निवासमंडप, त्याचा तंबू आणि त्याचे आच्छादन, आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
12कोश व त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण व त्याचा पडदा;
13मेज व त्याचे दांडे आणि त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
14प्रकाशासाठी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे, दिवे आणि प्रकाशासाठी तेल;
15धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप;
निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
16होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य;
कास्याचे गंगाळ व त्याची बैठक;
17अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;
18निवासमंडप, त्याचे अंगण व त्यांच्या मेखा व त्यांच्या दोर्‍या;
19पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.”
20मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला, 21आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली. 22ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले. 23ज्यांच्याकडे निळे, जांभळे किंवा किरमिजी कापड किंवा रेशमी तागाचे होते किंवा बोकडाचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी किंवा टिकाऊ चर्म होते ते आणले. 24चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले. 25प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले. 26आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले. 27पुढार्‍यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली. 28त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले. 29याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली.
बसालेल व ओहोलियाब
30मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, 31आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— 32सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे, 33आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे. 34आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे. 35याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

सध्या निवडलेले:

निर्गम 35: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन