7
1मग याहवेह मोशेला म्हणाले, “पाहा, मी तुला फारोहसाठी परमेश्वरासारखे केले आहे आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा असेल. 2तुला जे काही मी आज्ञापिणार आहे ते सर्व तू बोलावयचे आणि तुझा भाऊ अहरोन याने इस्राएली लोकांना त्याच्या देशातून जाऊ द्यावे असे फारोहला सांगावयाचे आहे. 3पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि इजिप्तमध्ये जरी मी माझी चिन्हे व चमत्कार बहुगुणित करेन, 4तरीही फारोह तुझे ऐकणार नाही. मग मी इजिप्तवर माझा हात उगारेन आणि मोठ्या पराक्रमी कृत्यांच्या न्यायाने मी माझे सैन्य, माझे इस्राएली लोक यांना बाहेर काढेन. 5आणि जेव्हा मी माझा हात इजिप्तविरुद्ध उगारेन आणि इस्राएलास बाहेर आणेन, तेव्हा इजिप्तच्या लोकांना समजेल की मीच याहवेह आहे.”
6मग मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. 7जेव्हा ते फारोहपुढे जाऊन बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.
अहरोनाच्या काठीचा साप होतो
8मग याहवेह मोशे व अहरोन यास म्हणाले, 9“जेव्हा फारोह तुम्हाला म्हणेल, ‘चमत्कार करून दाखवा,’ तेव्हा अहरोनास सांग, ‘तुझी काठी घे आणि फारोहसमोर खाली टाक,’ आणि तिचा साप होईल.”
10मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व याहवेहने त्यांना सांगितल्याप्रमाणेच केले. अहरोनाने आपली काठी फारोहसमोर व त्याच्या सेवकांसमोर खाली जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला. 11तेव्हा फारोहने इजिप्तच्या ज्ञानी व मांत्रिकांना बोलाविले. त्यांनीही आपल्या गुप्त ज्ञानानुसार तसेच केले: 12प्रत्येकाने आपआपली काठी खाली टाकली आणि त्यांचा साप झाला. पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. 13तरी देखील याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण झाले आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.
रक्ताची पीडा
14तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो. 15फारोह सकाळी बाहेर नदीकडे जात असताना त्याच्याकडे जा. नाईल नदीच्या काठावर जाऊन त्याची भेट घे आणि ज्या काठीचा साप झाला होता, ती काठी आपल्या हातात घे. 16मग त्याला सांग, ‘याहवेह, इब्रींचे परमेश्वर यांनी मला हे सांगण्यासाठी तुझ्याकडे पाठविले आहे: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी रानात जाऊन माझी उपासना करावी, पण अजूनही तू ऐकले नाहीस. 17याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल. 18मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ”
19मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा#7:19 किंवा त्यांच्या मूर्तींवर रक्त असेल.”
20मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले. 21नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते.
22पण इजिप्तच्या जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने पाण्याचे रक्त केले. फारोहचे मन पुन्हा कठीण झाले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही. 23आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला. 24आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते.
बेडकांची पीडा
25याहवेहने नाईलवर प्रहार करून सात दिवस लोटले.