निर्गम 8
8
1मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी. 2तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन. 3नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील. 4बेडूक तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर आणि तुझ्या सर्व अधिकार्यांवर येतील.”
5यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”
6त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला. 7पण जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने तसेच केले व इजिप्त देशात बेडूक आणले.
8मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”
9मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”
10फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.”
मोशेने उत्तर दिले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, अशासाठी की तू जाणावे की याहवेह आमचे परमेश्वर यासारखे इतर कोणीही नाही. 11नाईल नदीतील बेडूक सोडून बाकीचे सर्व बेडूक तू, तुझे घर, तुझे सेवक व तुझ्या लोकांपासून निघून जातील.”
12मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली. 13मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले. 14त्यांचे ढीग जमा झाले, व देशात त्यांची दुर्गंधी पसरली. 15पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.
चिलटांची पीडा
16मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.” 17त्यांनी तसे केले, आणि जेव्हा अहरोनाने काठी घेऊन आपला हात लांब केला आणि भूमीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्य व जनावरे यावर चिलटे आली. इजिप्त देशभरातील सगळी धूळ चिलटे अशी झाली. 18परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही.
कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती, 19तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.
गोमाश्यांची पीडा
20यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी. 21जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझ्यावर आणि तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर व तुमच्या घरांमध्ये गोमाश्यांचे थवे पाठवेन. इजिप्त लोकांची घरे गोमाश्यांनी भरून जातील; व जमीन सुद्धा गोमाश्यांनी झाकली जाईल.
22“पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे. 23माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.”
24आणि याहवेहने तसेच केले. आणि पाहा, फारोहचा राजवाडा, त्याच्या अधिकार्यांची घरे व इजिप्तच्या लोकांची सर्व घरे गोमाश्यांच्या दाट थव्यांनी भरून गेली; आणि गोमाश्यांनी देशाची नासाडी केली.
25मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”
26पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय? 27म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.”
28फारोहने म्हटले, “तुमचा परमेश्वर याहवेह यास रानात जाऊन यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देतो, परंतु फार दूर जाऊ नका. आता माझ्यासाठी विनंती करा.”
29मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”
30मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली, 31व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही. 32परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.
सध्या निवडलेले:
निर्गम 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.