निर्गम 9
9
पशूंमध्ये मरीची पीडा
1तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.” 2जर तू त्यांना जाण्यास नकार दिला आणि त्यांना धरून ठेवलेस, 3तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल. 4परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ”
5याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.” 6आणि दुसर्या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही. 7फारोहने शोध घेतला व जाणून घेतले की इस्राएलातील एकही जनावर मेले नाही, तरीसुद्धा फारोहचे मन बदलले नाही व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.
गळवांची पीडा
8नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी. 9व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”
10तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली. 11मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती. 12पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.
गारांची पीडा
13मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे. 14नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही. 15वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते. 16परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे. 17तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस. 18म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन. 19म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”
20फारोहच्या ज्या अधिकार्यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली. 21पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.
22मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.” 23जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली. 24गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले. 25गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले. 26फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.
27मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो. 28याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट#9:28 मेघांचा हा गडगडाट अक्षरशः परमेश्वराने वाजवलेली टाळी व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”
29मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे. 30पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.”
31(आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती. 32पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)
33मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला. 34पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले. 35याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते.
सध्या निवडलेले:
निर्गम 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.