36
इस्राएलाच्या पर्वतांसाठी आशा
1“मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांना भविष्यवाणी करून सांग, ‘इस्राएलच्या पर्वतांनो, याहवेहचे वचन ऐका. 2सार्वभौम याहवेह असे म्हणतात: शत्रूंनी तुम्हाला म्हटले, “अाहा! पुरातन शिखरे आमचे वतन झाले आहे.” ’ 3म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे, 4यास्तव, इस्राएलच्या पर्वतांनो सार्वभौम याहवेहचे वचन ऐका: पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्यांना, ओसाड अवशेष व तुमच्या सभोवती असलेल्या बाकीच्या राष्ट्रांनी लुटून अपमानित केलेल्या उजाड नगरांना सार्वभौम याहवेह असे म्हणतात; 5सार्वभौम याहवेह म्हणतात: माझ्या पेटलेल्या आवेशात बाकी राष्ट्रांच्या विरुद्ध, आणि एदोमविरुद्ध मी बोललो, कारण त्यांच्या हृदयातील उल्हास व द्वेषाने त्यांनी माझ्या देशातील कुरणे लुटावी म्हणून त्याला आपलेच वतन करून घेतले.’ 6म्हणून इस्राएल देशासंबंधी भविष्यवाणी कर आणि पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही राष्ट्रांचा अपमान सहन केला म्हणून मी माझ्या ईर्षेच्या क्रोधात बोलतो. 7म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या उंचावलेल्या हाताने मी शपथ घेतो की, तुमच्या सभोवती असलेली राष्ट्रे देखील अपमान सहन करतील.
8“ ‘पण इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्हावर माझ्या इस्राएली लोकांसाठी फांद्या फुटून फळे येतील, म्हणजे माझे लोक लवकर घरी येतील. 9मी तुझ्याविषयी विचार करतो आणि मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहीन; तुझ्यावर नांगरणी व पेरणी होईल, 10आणि तुझ्यात, होय, सर्व इस्राएलात पुष्कळ लोक वसतील असे मी करेन. नगरे वसतील आणि भग्नावशेष पुन्हा बांधले जातील. 11तुमच्यात राहणार्या लोकांची व प्राण्यांची संख्या मी वाढवेन आणि ते फलद्रूप होतील व संख्येने वाढतील. पूर्वीप्रमाणे मी तुझ्यावर लोकांना वसवीन आणि पूर्वीपेक्षा तुझी अधिक समृद्धी करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 12लोकांनी, माझ्या इस्राएल लोकांनी तुम्हावर वस्ती करावी असे मी करेन. ते तुमचा ताबा घेतील आणि तुम्ही त्यांचे वतन व्हाल; तुम्ही पुन्हा त्यांना लेकरांपासून वंचित करणार नाही.
13“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण काहीजण तुम्हाला म्हणतात, “तुम्ही लोकांना गिळून टाकता आणि राष्ट्राला लेकरांपासून वंचित ठेवतात,” 14यामुळे यापुढे तुम्ही लोकांना गिळणार नाही, ना राष्ट्राला अपत्यहीन ठेवाल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 15मी तुम्हाला पुन्हा राष्ट्रांचे टोमणे ऐकू देणार नाही आणि तुम्ही पुन्हा लोकांचा अपमान सहन करणार नाही किंवा तुमच्या राष्ट्राचे पतन होऊ देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
इस्राएलची पुनर्स्थापना निश्चित
16याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले: 17“मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती. 18म्हणून मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतला कारण त्यांनी देशात रक्तपात केला आणि त्यांनी देशाला त्यांच्या मूर्तींनी विटाळले. 19म्हणून मी त्यांना राष्ट्रांमध्ये विखुरले आणि ते देशांमध्ये पांगले; मी त्यांचा त्यांच्या वर्तनानुसार आणि त्यांच्या कृत्यांनुसार न्याय केला. 20आणि राष्ट्रांमध्ये ते जिथे कुठे गेले त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला, कारण त्यांच्याविषयी असे म्हटले गेले होते, ‘हे याहवेहचे लोक आहेत, तरीही याहवेहचा देश त्यांना सोडावा लागला.’ 21माझ्या पवित्र नावाची मला काळजी होती, जे इस्राएली लोकांनी ते ज्या राष्ट्रांमध्ये गेले तिथे कलंकित केले होते.
22“म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे. 23मी माझ्या महान नावाचे पावित्र्य दाखवेन, जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले गेले, ते नाव त्यांच्यामध्ये तुम्ही अपवित्र केले आहे. जेव्हा तुमच्याद्वारे त्यांच्या दृष्टीत माझे नाव पवित्र मानले जाईल, तेव्हा राष्ट्रे जाणतील की मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
24“ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन. 25मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन. 26मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन. 27आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन. 28तेव्हा तुमच्या पूर्वजांना जो देश मी देऊ केला त्यात तुम्ही वस्ती कराल; तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन. 29मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून मुक्त करेन. मी धान्यास आज्ञा देईन आणि ते अनेकपट करेन आणि तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही. 30तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही. 31तेव्हा तुम्हाला तुमचे कुमार्ग आणि दुष्कृत्यांची आठवण होईल आणि तुमच्या पापांमुळे व अमंगळ कामांमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल. 32माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!
33“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करेन, मी तुमची नगरे पुनर्स्थापित करेन आणि उद्ध्वस्त झालेल्याची पुनर्बांधणी करेन. 34येजा करणार्यांच्या नजरेसमोर उजाडलेली भूमी वैराण पडण्याऐवजी तिची मशागत होईल. 35ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.” 36तेव्हा तुमच्या सभोवती उरलेली राष्ट्रे जाणतील की मी याहवेहने उजाड झालेले पुन्हा बांधले आहे आणि ओसाड पडलेले होते त्याची पुन्हा लागवड केली आहे. मी याहवेह हे बोललो आहे, आणि ते मी करणारच.’
37“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एकदा पुन्हा मी इस्राएलची विनंती मान्य करेन आणि त्यांच्यासाठी हे करेन: त्यांचे लोक मी मेंढरांसारखे असंख्य करेन, 38तिच्या नेमलेल्या सणांच्या वेळी यरुशलेममध्ये अर्पणासाठी लागतील तेवढे असंख्य कळप मी करेन. म्हणजे पडीक असलेली शहरे लोकांच्या कळपांनी भरतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”