38
राष्ट्रांवर याहवेहचा मोठा विजय
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, मागोग देशाचा रोष#38:2 किंवा गोगचा राजपुत्र, जो मेशेख व तूबाल यांचा राजपुत्र आहे त्याच्याकडे आपले मुख कर व त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर 3आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष,#38:3 गोग मी तुझ्याविरुद्ध आहे. 4मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन. 5पर्शिया, कूश#38:5 म्हणजेच नाईल नदीचा वरचा भाग आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील. 6गोमेर आपल्या सर्व सैन्यासह आणि उत्तरेकडील बेथ-तोगर्माह आपल्या पूर्ण सैन्यासह—अनेक राष्ट्रे तुझ्याबरोबर बाहेर निघतील.
7“ ‘तू व तुझ्याकडे एकत्र झालेला समूह सिद्ध व्हा; तयार राहा आणि त्यांचा नायक हो. 8पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील. 9तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.
10“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल. 11तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात. 12मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध#38:12 किंवा पृथ्वीचा मध्य राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.” 13शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’
14“यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय? 15उत्तरेकडील तुझ्या स्थानातून तू येशील, तू आणि तुझ्याबरोबर पुष्कळ राष्ट्रे, त्यातील प्रत्येक घोड्यावर स्वार असलेले, मोठे दळ, मोठे सैन्य असेल. 16मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.
17“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तूच तो आहे, ज्याबद्दल मी पुरातन काळी माझ्या सेवकांद्वारे व इस्राएलच्या संदेष्ट्यांद्वारे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी पुष्कळ वर्षे भविष्यवाणी केली की मी तुला त्यांच्याविरुद्ध आणेन. 18त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 19माझी ईर्षा व पेटलेल्या संतापाने मी जाहीर करतो की, त्यावेळी इस्राएल देशात मोठा भूकंप येईल. 20समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल. 21मी गोगविरुद्ध माझ्या सर्व पर्वतांवर तलवार बोलवेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. प्रत्येकाची तलवार आपआपल्या भावाविरुद्ध चालेल. 22मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन. 23अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’