42
याजकांसाठी खोल्या
1मग त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरील अंगणात आणले आणि मंदिराच्या अंगणासमोर व उत्तरेच्या बाहेरील भिंतीच्या समोर असलेल्या खोल्यांमध्ये आणले. 2या इमारतीचे द्वार जे उत्तरेकडे होते त्याची लांबी शंभर हात व रुंदी पन्नास हात होती.#42:2 किंवा 53 मीटर लांब व 27 मीटर रुंद 3आतील अंगणापासून बाहेरील अंगणाच्या पाऊलवाटेच्या समोरपर्यंत दोन्ही वीस हाताच्या खंडात होते, तीन मजल्यांवर समोरासमोर सज्जे होते. 4खोल्यांच्या समोर आतील मार्ग होता जो दहा हात रुंद आणि शंभर हात लांब होता. त्याच्या उत्तरेच्या बाजूने दरवाजे होते. 5तळ आणि मधल्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा वरील मजल्यावरील खोल्या अरुंद होत्या, कारण सज्ज्यांनी अधिक जागा घेतली होती. 6जसे अंगणात होते तसे वरच्या मजल्याच्या खोल्यांना खांब नव्हते; म्हणून तळ आणि मधल्या मजल्यांपेक्षा त्या मजल्याची जागा कमी होती. 7खोल्या आणि बाहेरील अंगणाला समांतर अशी बाहेरून एक भिंत होती; ती खोल्यांच्या समोर पन्नास हाताइतकी पुढे गेली होती. 8बाहेरील अंगणाच्या बाजूला असलेल्या खोल्यांची रांग पन्नास हात लांब होती आणि पवित्रस्थानाच्या अगदी जवळ असलेल्या खोल्यांची रांग शंभर हात लांब होती. 9बाहेरील अंगणातून तळ मजल्यावरील खोल्यांमध्ये जाण्यार्यांसाठी पूर्वेकडून प्रवेशद्वार होते.
10दक्षिणेच्या बाजूला बाहेरील अंगणाच्या भिंतीच्या लांबीलगत, मंदिराच्या अंगणाला जोडलेल्या आणि बाहेरील भिंतीसमोर खोल्या होत्या 11ज्यांच्यासमोर एक पाऊलवाट होती. उत्तरेकडे असलेल्या खोल्यांप्रमाणेच या खोल्या होत्या; त्यांची लांबी व रुंदी सारखीच होती आणि बाहेर जाण्याचा मार्ग व त्याचा आकार उत्तरेला असलेल्या दरवाजा सारखाच होता. 12दक्षिणेकडील खोल्यांचाही दरवाजा होता. खोल्यांमध्ये जाण्यास मार्गाच्या सुरुवातीला एक दरवाजा होता, हा मार्ग पूर्वेच्या बाजूने वाढत जाऊन त्या भिंतीला समांतर होत्या.
13तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे#42:13 किंवा शुद्धार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे. 14जेव्हा कधी याजक पवित्रस्थानात प्रवेश करतात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करतात ती पवित्रस्थानात ठेवल्याशिवाय त्यांनी बाहेरील अंगणात जाऊ नये, कारण ती पवित्र वस्त्रे आहेत. लोकांकडे जाण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जाण्याअगोदर याजकांनी दुसरी वस्त्रे घालावी.”
15मंदिराच्या आतील भागात असलेल्या वस्तूंची मापे घेण्याचे संपविल्यावर, त्याने मला पूर्वेकडील द्वारातून बाहेर आणले आणि सभोवतालचा भाग मापला. 16मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे#42:16 किंवा 265 मीटर हात होता. 17त्याने उत्तरेकडील भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात भरला. 18त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता. 19मग त्याने वळून पश्चिमेचे माप घेतले; ते मापन-दंडाने पाचशे हात होते. 20याप्रकारे त्याने चारही बाजूंचे माप घेतले. त्याच्याभोवती एक भिंत होती, जी पाचशे हात लांब आणि पाचशे हात रुंद असून पवित्रस्थानाला सर्वसाधारण स्थानापासून वेगळी करीत होती.