44
याजकीयत्वाची पुनर्स्थापना
1तेव्हा त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरील द्वाराकडे परत आणले, ज्याचे तोंड पूर्वेकडे होते आणि ते बंद होते. 2याहवेहने मला म्हटले, “हे द्वार बंदच असावे. ते उघडले जाऊ नये; त्यातून कोणीही प्रवेश करू नये. ते बंदच असावे कारण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने त्यातून प्रवेश केला. 3केवळ राजपुत्रच स्वतः द्वारात बसून याहवेहसमोर भोजन करू शकेल. त्याने देवडीच्या द्वारातून आत यावे आणि तिथूनच बाहेर जावे.”
4नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो.
5याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे. 6बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे! 7तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला. 8माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली. 9सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हृदयाने व शरीराने बेसुंती असे विदेशी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करणार नाहीत, जे विदेशी इस्राएलात राहतात त्यांनी सुद्धा येऊ नये.
10“ ‘इस्राएली लोक बहकले तेव्हा जे लेवी माझ्यापासून भरकटले व दूर गेले आणि त्यांच्या मूर्तींच्या मागे गेले ते त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगतील. 11मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील. 12परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 13त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी. 14मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन.
15“ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 16केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील.
17“ ‘ते जेव्हा आतील अंगणाच्या द्वारातून प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे घालावी; आतील अंगणाच्या द्वारात किंवा मंदिरात सेवा करीत असताना त्यांनी कोणतेही लोकरीचे वस्त्र घालू नये. 18त्यांनी आपल्या डोक्यावर तागाचे फेटे आणि आपल्या कंबरेभोवती तागाची अंतर्वस्त्रे घालावी. त्यांना घाम येईल अशी वस्त्रे त्यांनी घालू नये. 19लोक आहेत तिथे बाहेरील अंगणात जेव्हा ते जातात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करीत होते ते काढून पवित्र खोलीत ते ठेवावे आणि दुसरे कपडे घालावे, म्हणजे त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करून लोकांनी पवित्र होऊ नये.
20“ ‘त्यांनी आपल्या डोक्यांचे मुंडण करू नये किंवा आपले केस लांब वाढू देऊ नये, परंतु त्यांनी आपल्या डोक्यावरील केस कापावे. 21आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये. 22त्यांनी विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी विवाह करू नये; केवळ इस्राएली गोत्रातील कुमारिकांशी किंवा याजकाच्या विधवेशी विवाह करावा. 23पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे.
24“ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.
25“ ‘मृत देहाकडे जाऊन याजकाने स्वतःस अशुद्ध करू नये; तरीही ती मृत व्यक्ती जर त्याचा पिता किंवा आई, मुलगा किंवा मुलगी, भाऊ किंवा अविवाहित बहीण असली, तर तो स्वतःस अशुद्ध करू शकतो. 26शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे. 27ज्या दिवशी पवित्रस्थानात सेवा करण्यास तो आतील अंगणात जातो, तेव्हा त्याने स्वतःसाठी पापार्पण#44:27 किंवा शुद्धीकरणाचे अर्पण करावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
28“ ‘याजकांचे वतन केवळ मीच आहे. तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये कोणताही वाटा देऊ नये; मीच त्यांचा वाटा आहे. 29अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल. 30प्रथमफळातील जे सर्वोत्तम आणि तुमच्या सर्व विशेष भेटी याजकांच्या होतील. तुमच्या भूमीतील प्रथम भाग याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराण्यावर आशीर्वाद राहेल. 31मेलेला किंवा हिंस्र पशूने फाडलेला कोणताही मृत पक्षी किंवा पशू याजकांनी खाऊ नये.