5
परमेश्वराच्या न्यायाचा वस्तरा
1“आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर. 2जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन. 3परंतु त्यातील काही केस घेऊन ते आपल्या कपड्यात खोचून ठेव. 4पुन्हा त्यातून काही केस घे व ते अग्नीत जाळून टाक. तिथूनच सर्व इस्राएलमध्ये अग्नी पसरेल.
5“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेम आहे, ज्याला मी सर्व राष्ट्रांच्या मधोमध स्थापित केले, आणि तिच्याभोवती सर्व राष्ट्रे ठेवली. 6तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.
7“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.
8“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन. 9जे मी पूर्वी कधी केले नाही किंवा पुन्हा करणार नाही असे तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे तुला करेन. 10म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्यावर पसरवून टाकीन. 11म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही. 12तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.
13“तेव्हा माझा राग शांत होईल आणि त्यांच्याविषयी असलेला क्रोध कमी होईल आणि माझा सूड पूर्ण होईल. जेव्हा त्यांच्यावरील माझा क्रोध संपेल, तेव्हा ते जाणतील की मी याहवेह आपल्या ईर्षेने बोललो आहे.
14“तुझ्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांमध्ये आणि जे तुझ्याजवळून जातील त्यांच्या समक्ष मी तुझा नाश व तुला निंदा असे करेन. 15जेव्हा मी माझा राग व क्रोधाच्या फटक्याने व निषेधाच्या आरोपाने तुला शासन करेन, तेव्हा तू तुझ्या सभोवतालच्या राष्ट्रांना निंदा व टोमणा, चेतावणी व भयाचा विषय होशील. मी याहवेह हे बोललो आहे. 16जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन. 17मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.”