8
मंदिरातील मूर्तिपूजा
1सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला. 2मी पाहिले, आणि मनुष्यासारखी#8:2 किंवा धगधगीत अग्नीसारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते. 3हातांसारख्या दिसणार्या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती. 4आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.
5तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.
6आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
7मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले. 8तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.
9आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.” 10म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली. 11त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता.
12तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ” 13तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.”
14मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या. 15तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय? यापेक्षा अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
16मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.
17तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत! 18म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”