एज्रा 10
10
लोकांचा पापांगिकार
1परमेश्वराच्या भवनासमोर जमिनीवर पडून एज्रा रडत प्रार्थना करीत व पापांगिकार करीत असताना, इस्राएली पुरुष, स्त्रिया व मुले यांचा एक फार मोठा समुदाय त्याच्याभोवती जमा झाला. तेही अत्यंत दुःखाने रडू लागले. 2मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे. 3आता जे आमच्या परमेश्वराचे भय धरतात व त्यांच्या आज्ञा पाळतात, ते आपण या स्त्रियांना सोडून देण्याचे वचन देऊ या. माझ्या स्वामीच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांना त्यांच्या मुलांबाळांसह परत पाठवून देऊ. सर्वकाही परमेश्वराच्या नियमानुसार झाले पाहिजे. 4तर आता ऊठ; या सर्वगोष्टी तुझ्या हातात आहेत. आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, म्हणून धैर्य धर व योग्य ते कर.”
5तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली. 6मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.
7मग संबध यहूदीयात व यरुशलेमात असे जाहीर करण्यात आले की बंदिवासातून परतलेल्या प्रत्येक इस्राएलीने यरुशलेमला यावे. 8इस्राएलांच्या पुढार्यांनी आणि वडीलजनांनी असे ठरविले की जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येण्याचे नाकारील तो आपले वतन गमावेल आणि त्याला बंदिवासातून परतलेल्या इस्राएलाच्या सभेतून बहिष्कृत करण्यात येईल.
9तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते. 10मग एज्रा याजक उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे, कारण तुम्ही गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले आहेत आणि आपण इस्राएलचे पातक आणखीच वाढविले आहे. 11आता याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराचा गौरव करा#10:11 किंवा तुमची पापे पदरी घेऊन येथून पुढे त्यांच्याच इच्छेप्रमाणे करा. स्वतःला सभोवतालच्या लोकांपासून आणि या गैरयहूदी स्त्रियांपासून वेगळे करा.”
12तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू. 13पण इथे अनेकजण आहेत आणि आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे की आम्ही येथे बाहेर आपल्या शक्तीने थांबूही शकत नाही. तसेच आम्ही इतके घोर पातक केले आहे की हे सर्व सुरळीत होण्यास एक दोन दिवस पुरेसे होणार नाहीत. 14आमच्या पुढार्यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.” 15फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला.
16तेव्हा बंदिवासातून परतलेल्यांना जी सूचना करण्यात आली होती त्यानुसार केले. एज्रा याजकाने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून सर्व पितृकुळांच्या पुढार्यातून एकास निवडले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते या बाबींची चौकशी करण्यास बसले. 17आणि गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केलेल्या पुरुषांचा निवाडा करण्याचे काम पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी संपविले.
मिश्रविवाहाचे दोषी
18ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद:
मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह. 19(त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)
20इम्मेराचे वंशज:
हनानी व जबद्याह.
21हारीमाचे वंशज:
मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह.
22पशहूराचे वंशज:
एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह.
23लेवी मधून:
योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.
24गायकांपैकी:
एल्याशीब हा होता.
द्वारपालापैकी:
शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.
25इतर इस्राएली लोकांपैकी:
पारोशाच्या कुळातील:
रमियाह, यिज्जीयाह, मल्कीयाह, मियामीन, एलअज़ार, मल्कीयाह व बेनाइयाह.
26एलामाच्या कुळातील:
मत्तन्याह, जखर्याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.
27जत्तूच्या कुळातील:
एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,
28बेबाईच्या कुळातील:
यहोहानान, हनन्याह, जब्बइ व अथलाइ.
29बानीच्या कुळातील:
मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.
30पहथ-मोआबाच्या कुळातील:
अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,
31हारीमाच्या कुळातील:
एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन, 32बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.
33हाशूमाच्या कुळातील:
मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.
34बानीच्या कुळातील:
मादइ, अम्राम, ऊएल, 35बेनाइयाह, बेदयाह, कलूही, 36वन्या, मरेमोथ, एल्याशीब, 37मत्तन्याह, मत्तनई, यासय.
38बानी, बिन्नुई कुळातील:
शिमी, 39शेलेम्याह, नाथान, अदायाह, 40मखनदबइ, शेशय, शारइ, 41अजरएल, शेलेम्याह, शमरियाह, 42शल्लूम, अमर्याह व योसेफ.
43नबोच्या कुळातील:
ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह.
44या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.#10:44 किंवा त्यांना त्यांच्या लेकरांसहित लावून दिले
सध्या निवडलेले:
एज्रा 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.