YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 3

3
वेदीची पुनर्बांधणी
1यहूदीयाला परतलेले सर्व इस्राएली लोक आपआपल्या शहरात स्थायिक झाल्यावर ते सातव्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र आले. 2नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली. 3आसपासच्या राष्ट्रातील लोकांचे भय असून देखील ती वेदी आधीच्याच पायावर परत बांधण्यात आली आणि याहवेहस सकाळ संध्याकाळच्या होमार्पणांसाठी तिचा ताबडतोब उपयोग करण्यात आला. 4मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी मंडपांचा सण पाळला व सणाच्या नियमानुसार प्रतिदिवसासाठी नेमलेले होमबली प्रत्येक दिवशी अर्पिले. 5याशिवाय नेहमीचे होमबली आणि चंद्रदर्शनाचे व सर्व सणांचे बली, तसेच याहवेहच्या इतर वार्षिक उत्सवांचे बली व लोकांनी याहवेहसाठी स्वखुशीने आणलेले बली त्यांनी अर्पण केले. 6याहवेहच्या मंदिराचा पाया अद्याप घातला गेला नव्हता, तरी सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी याहवेहला होमार्पणे करण्यास सुरुवात केली.
मंदिराची पुनर्बांधणी
7नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्‍याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
8इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले. 9परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे#3:9 किंवा होदावीआह वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते.
10बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली. 11त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली:
“याहवेह चांगले आहेत.
इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.”
याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली. 12पण वयस्कर याजक, लेवी, व इतर पुढारी यातील पुष्कळजण, ज्या लोकांनी पूर्वीचे मंदिर बघितले होते ते शलोमोनाने बांधलेल्या सुंदर मंदिराची आठवण काढून एकीकडे मोठ्याने रडू लागले, तर दुसरीकडे त्यांच्यापैकी काही मोठ्या आनंदाने जयघोष करू लागले. 13लोक इतक्या मोठ्याने जयघोष करीत होते की त्यांचा आवाज दूर अंतरावरूनही ऐकू येत होता आणि त्यामुळे रडण्याचा आवाज व आनंदाचा आवाज यातील फरक लोकांना समजत नव्हता.

सध्या निवडलेले:

एज्रा 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन