YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 4

4
बांधकामास विरोध
1बंदिवासातून परत आलेले लोक याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधत आहेत, हे जेव्हा यहूदाह व बिन्यामीनच्या शत्रूंनी ऐकले, 2तेव्हा ते जरूब्बाबेल व इतर पुढाऱ्यांकडे आले व म्हणाले, “आपण मिळून काम करू या. कारण तुमच्या परमेश्वराची तुम्हाला जितकी आस्था आहे, तितकीच आम्हालाही आहे. अश्शूरचा राजा एसरहद्दोनने आम्हाला येथे आणल्यापासून आम्ही याहवेहला अर्पणे करीत आहोत.”
3पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”
4नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.#4:4 किंवा त्रास दिला 5त्यांनी अधिकार्‍यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
यरुशलेमच्या पुनर्बांधणीस विरोध
6नंतर जेव्हा अहश्वेरोश#4:6 किंवा झेरेस राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली.
7राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले.
8राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:
9राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते. 10तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर#4:10 किंवा अशुरबनीपल ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात#4:10 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते.
11अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता:
अर्तहशश्त महाराज,
फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.
12कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे.
13परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील. 14आमचे आश्रयदाते म्हणून आम्ही आपले ॠणी आहोत आणि महाराजांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेऊन, आपली अप्रतिष्ठा व्हावी, हे आम्हाला बघण्याची इच्छा नाही. म्हणून आम्ही ही बातमी महाराजांस पत्र पाठवून कळवीत आहोत. 15आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता. 16आता आम्ही असे जाहीर करू इच्छितो की जर हे नगर परत बांधले गेले आणि त्याची तटबंदी पूर्ण झाली, तर फरात नदीच्या पलीकडील काहीही प्रदेश महाराजांच्या ताब्यात राहणार नाही.
17नंतर राजाने उत्तर दिले:
राज्यपाल रहूम व शिमशय लेखक व शोमरोनात राहणार्‍या व फरात नदीच्या पश्चिमेस राहणार्‍या सर्वांना,
शुभेच्छा!
18आपण पाठविलेले पत्र भाषांतर करून मला वाचून दाखविण्यात आले. 19जुन्या नोंदी तपासून पाहण्याचा मी हुकूम दिला आहे आणि गतकाळात यरुशलेम नगर खरोखरच अनेक राजांची मोठी डोकेदुखी होती असे मला आढळून आले आहे. वास्तविक पाहता बंडाळी व राजद्रोह या गोष्टी येथे नेहमीच्याच होत्या. 20यरुशलेममध्ये असे बलवान राजे होते की त्यांनी फरात नदीच्या पलीकडील संपूर्ण प्रदेशात राज्य केले व त्यांना कर, खंडणी, नजराणे दिले जात असे. 21म्हणून मी आज्ञा देतो की त्या लोकांनी नगर पुन्हा बांधण्याचे काम, मी पुन्हा हुकूम देईपर्यंत थांबवावे. 22सावध असा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. राजाला उपद्रव होईपर्यंत हा धोका का वाढू द्यावा?
23राजा अर्तहशश्तचे हे पत्रे जेव्हा रहूम व शिमशय यांना वाचून दाखविण्यात आले, तेव्हा ते लगेचच यरुशलेमला गेले आणि यहूदी लोकांना जबरदस्तीने काम बंद करण्यास त्यांनी भाग पाडले.
24अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत स्थगित झाले.

सध्या निवडलेले:

एज्रा 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन