9
मिश्र विवाहांबाबत एज्राची प्रार्थना
1या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही. 2या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”
3जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा मी माझा अंगरखा फाडला, डोक्याचे व दाढीचे केस उपटले आणि अत्यंत भयभीत मनस्थितीत मी खाली बसलो. 4या विश्वासघातामुळे बंदिवासातून परतलेल्या इस्राएली लोकांच्या मनात परमेश्वराच्या वचनाचे भय उत्पन्न झालेले पुष्कळजण माझ्याभोवती गोळा झाले. सायंकाळच्या होमार्पणाची वेळ होईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो.
5सरतेशेवटी, सायंकाळच्या होमार्पणाची वेळ झाल्यावर अत्यंत गोंधळलेल्या, माझा झगा व अंगरखा फाटलेल्या स्थितीतच मी गुडघे टेकले आणि याहवेह माझ्या परमेश्वराकडे हात उंचावले. 6आणि त्यांचा धावा करून म्हटले:
“हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत. 7आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे.
8“पण आता या थोड्या काळासाठी याहवेह आमच्या परमेश्वराने आमच्यावर कृपा करून आमच्यापैकी काही थोड्या लोकांना जिवंत राखले आणि त्यांच्या या पवित्रस्थानी आम्हाला स्थिर केले आहे. आमच्या परमेश्वराने आमच्या दृष्टीस प्रकाश दिला व आम्हाला गुलामगिरीतून थोडी विश्रांती दिली आहे. 9आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.
10“पण हे आमच्या परमेश्वरा, आता आम्ही तुमच्यापुढे काय बोलावे? कारण आम्ही तुमचे नियम मोडले आहेत. 11तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे. 12म्हणून आपल्या कन्या या राष्ट्रांच्या पुरुषांना देऊ नयेत आणि त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांना करून घेऊ नयेत. त्या राष्ट्रांशी कोणत्याही प्रकारे मैत्रीचा समेट करू नये. तरच तुम्ही सुदृढ होऊन तुम्हाला त्या भूमीचे उत्तम फळ लाभेल व ती समृद्धी आमच्या मुलाबाळांस सदासर्वकाळचे वतन म्हणून लाभेल.’
13“तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस 14तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय? 15हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.”