34
दीनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड
1एके दिवशी याकोबापासून झालेली लेआची कन्या दीना त्या देशातील मुलींना भेटावयास गेली. 2तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा पुत्र शेखेम, याने तिला पाहिले, तेव्हा तो तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून त्याने तिला भ्रष्ट केले. 3याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला. 4मग शेखेमने आपले वडील हमोर यांना म्हणाला, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.”
5आपली कन्या दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले आहे हे याकोबाने ऐकले त्यावेळी त्याचे पुत्र रानात गुरांबरोबर होते; म्हणून ते घरी परत येईपर्यंत त्याने त्याबाबत काहीही केले नाही.
6मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला. 7तेवढ्यात याकोबाचे पुत्रही रानातून घरी आले. शेखेमने इस्राएलात अशी भयानक गोष्ट करून याकोबाच्या कन्येला भ्रष्ट केल्याचे वृत ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आणि ते संतप्त झाले कारण ही अपमानजनक गोष्ट घडणे अत्यंत घृणास्पद होते.
8हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या. 9आमच्याशी सोयरीक करा; आम्हाला तुमच्या मुली द्या आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या. 10आमच्याबरोबर राहा; हा देश तुमच्यासमोर मोकळा आहे, त्यात राहा आणि व्यापार#34:10 किंवा मोकळे फिरा करा आणि मालमत्ता प्राप्त करा.”
11मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन. 12तुम्ही वधूबद्दल वाटेल तितका हुंडा आणि भेट मागा, मी ती तुम्हाला देईन, पण ती मुलगी मला पत्नी म्हणून द्या.”
13आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली. 14ते म्हणाले, “आमची बहीण शेखेमाला देणे आम्हाला जमणार नाही, कारण तुमची सुंता झालेली नाही. अशा बेसुंती मनुष्याबरोबर विवाह केल्यास आमचा अपमान होईल. 15आता आपण एक करार करू: जर तुमच्या देशातील प्रत्येक पुरुष आपली सुंता करून घेईल, 16तर तुमच्या मुली आम्ही करू व आमच्या मुली तुम्हाला देऊ व आम्ही तुमच्यामध्ये स्थायिक होऊ आणि तुमच्याबरोबर एक लोक होऊ. 17जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.”
18त्यांचा प्रस्ताव हमोर आणि त्याचा मुलगा शेखेम यांना चांगला वाटला. 19तो तरुण, जो त्याच्या वडिलांच्या घराण्यात सर्वात आदरणीय होता, त्याने जे सांगितले ते करण्यात वेळ घालविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे खूप मन बसले होते. 20म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली. 21ते म्हणाले, “हे लोक आपले मित्र आहेत. त्यांना आपण आपल्यात राहण्याचे आमंत्रण देऊ आणि व्यापार करण्यास परवानगी देऊ; कारण आपला देश त्यांनाही पुरेल इतका मोठा असून त्यांना येथे सहज राहता येईल आणि त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ. 22परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे. 23तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?”
24हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.
25परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली. 26हमोर आणि शेखेम यांचीही त्यांनी तलवारीने कत्तल केली. त्यांनी दीनाची शेखेमाच्या घरातून सुटका केली आणि तिला घेऊन ते परत आले. 27यानंतर याकोबाचे सर्व पुत्र शहरात गेले आणि त्यांनी ते संपूर्ण शहर लुटले, जिथे त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. 28त्यांनी त्यांचे कळप, गुरे, गाढवे आणि त्यांच्या नगरात व शेतात असलेले सर्वकाही त्यांनी नेले. 29तसेच त्यांच्या घरातील सर्व संपत्ती आणि त्यांच्या सर्व स्त्रिया व लेकरे, त्यांना जे काही घरात सापडले ते सर्व त्यांनी लुटले.
30तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”
31यावर त्यांनी प्रत्युत्तर केले, “त्याने आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे व्यवहार करावा काय?”