37
योसेफ आणि त्याचे भाऊ
1कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला.
2याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे:
योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या.
3इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला. 4जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.
5एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 6योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “माझे स्वप्न ऐका: 7आपण शेतात पेंढ्या बांधत होतो, तेवढ्यात माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या सर्वांच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती गोळा होऊन उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला नमन केले.”
8तेव्हा त्याच्या भावांनी त्याची हेटाळणी करून त्याला म्हटले. “काय! तू आमचा राजा होणार? तू आम्हावर सत्ता चालविणार?” आणि त्याच्या स्वप्नामुळे व त्याने त्याचे कथन केल्यामुळे ते त्याचा अधिक द्वेष करू लागले.
9पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तो त्यांना म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले. सूर्य, चंद्र आणि अकरा तारे यांनी मला खाली लवून नमन केले.”
10त्याने आपले स्वप्न आपल्या भावांबरोबर आपल्या वडिलांनाही सांगितले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला धमकावून विचारले, “हे काय बोलतोस? मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्याकडे येऊन तुला भूमीपर्यंत लवून नमन करणार आहोत काय?” 11या कारणामुळे त्याच्या भावांचा द्वेष अधिक तीव्र झाला; परंतु त्याच्या वडिलांनी ही बाब आपल्या मनात ठेवली.
योसेफाचे भाऊ त्याला विकतात
12योसेफाचे भाऊ आपल्या वडिलांची मेंढरे शेखेम येथे चारावयास घेऊन गेले होते. 13इस्राएलने योसेफाला म्हटले, “तुझे भाऊ शेखेम येथे मेंढरे चारावयास गेले आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे.”
योसेफ म्हणाला, “ठीक आहे.”
14याकोबाने योसेफास म्हटले, “तू शेखेमला जा आणि तुझ्या भावांचे सर्वकाही ठीक आहे का व कळपांची स्थिती कशी आहे, हे पाहून मला येऊन सांग.” नंतर याकोबाने त्याला हेब्रोन खोर्यातून पाठवले.
आणि तो शेखेमास पोहोचला. 15तो शेतातून फिरत असता त्याला एका मनुष्याने पाहिले आणि त्याने योसेफाला विचारले, “तू काय शोधीत आहेस?”
16योसेफाने उत्तर दिले, “मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते कुठे कळप चारीत आहे, हे मला सांगाल का?”
17तेव्हा तो मनुष्य म्हणाला, “होय, पण आता ते येथे नाहीत, ‘आपण दोथानला जाऊ’ तुझ्या भावांना असे बोलताना मी ऐकले.”
तेव्हा योसेफ भावांच्या मागे दोथानला गेला आणि ते त्याला तिथे आढळले. 18त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.
19ते एकमेकांना म्हणाले, “अरे हा स्वप्नदर्शी येत आहे. 20चला आपण याला ठार करू. त्याला एखाद्या विहिरीत फेकून देऊ आणि आपल्या वडिलांना सांगू की त्याला हिंस्र पशूने खाऊन टाकले आहे; मग त्याच्या स्वप्नांचे काय होते ते आपण पाहू.”
21जेव्हा रऊबेनने हे ऐकले तेव्हा त्याने योसेफाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; तो म्हणाला, “आपण त्याला जिवे मारणार नाही; 22आपण रक्तपात करणार नाही; तर आपण त्याला या रानातल्या विहिरीत फेकून देऊ; परंतु त्याला हात लावू नका.” रऊबेनने असा बेत केला होता की नंतर योसेफाला विहिरीतून काढावे आणि आपल्या वडिलांकडे परत पाठवून द्यावे.
23योसेफ त्यांच्याजवळ आला तेव्हा त्यांनी त्याचा झगा—जो गडद रंगाचा, सुशोभित होता—ओढून काढला, 24आणि त्याला एका कोरड्या विहिरीत फेकून दिले, ती विहीर रिकामी होती, तिच्यात पाणी नव्हते.
25मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.
26तेव्हा यहूदाह आपल्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला मारून त्याचा रक्तपात झाकून आपल्याला काय फायदा? 27चला आपण योसेफाला इश्माएली लोकांना विकून टाकू या, त्याला हात लावू नका, तो आपला भाऊच आहे, आपल्याच रक्तमांसाचा आहे.” त्या सर्व भावांना त्याचे म्हणणे पटले.
28मिद्यानी व्यापार्यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल#37:28 अंदाजे 230 ग्रॅ. चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.
29जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली. 30तो रडत आपल्या भावांना म्हणाला, “मुलगा विहिरीत नाही; आता मी कुठे जाऊ?”
31मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला. 32तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!”
33त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.”
34यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. 35त्याचे सर्व पुत्र आणि कन्या आले आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो म्हणत असे, “मी पुत्र शोकानेच मरेन आणि अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” अशा रीतीने तो त्याच्यासाठी दुःखाने रडत असे.
36दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले.