43
इजिप्त देशाचा दुसरा प्रवास
1परंतु देशात दुष्काळ तीव्र होता. 2इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.”
3तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ 4जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ. 5जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”
6इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?”
7यावर ते म्हणाले, “पण त्या मनुष्याने आपल्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाची खोल चौकशी केली. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचे वडील अजून जिवंत आहेत काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ आम्ही सहजपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुमच्या भावाला घेऊन या’ असे तो म्हणेल, असे आम्हाला कसे ठाऊक असणार?”
8तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही. 9त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील. 10जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.”
11नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा. 12दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल. 13तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा. 14त्या माणसापुढे, सर्वसमर्थ परमेश्वराने तुमच्यावर कृपा करावी म्हणजे तो दुसर्या भावाला आणि बिन्यामीनालाही तुमच्यासोबत परत पाठवेल. पण जर मी माझ्या पुत्रांना मुकलो तर मुकलो.”
15मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले. 16बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
17त्या मनुष्याने योसेफाच्या सांगितल्याप्रमाणे केले आणि त्याने माणसांना योसेफाच्या घरी नेले. 18त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.”
19घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्याकडे गेले; 20आणि त्याला म्हणाले, “महाराज, पहिल्या फेरीत आम्ही इथे धान्य खरेदीसाठी आलो होतो. 21तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे. 22या रकमेबरोबरच धान्य विकत घेण्यासाठी आम्ही वेगळी चांदी आणली आहे. आमच्या पोत्यांमध्ये आमची चांदी कोणी ठेवली हे आम्हाला माहीत नाही.”
23“ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.
24नंतर घरकारभार्याने त्यांना योसेफाच्या घरात नेले, त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांच्या गाढवांना चाराही दिला. 25योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते.
26योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या. 27त्याने त्यांना अभिवादन केले, मग त्याने विचारले, “त्या वृद्ध माणसाविषयी तुम्ही बोलला, ते तुमचे वडील कसे आहेत? ते अजून जिवंत आहेत काय?”
28“होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला.
29त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.” 30नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.
31मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.”
32योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत. 33प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले. 34योसेफ, जी पक्वान्ने खात होता, तीच पक्वान्ने त्यांनाही वाढण्यात आली. पण बिन्यामीनाला इतर भावांपेक्षा पाचपट अधिक वाढण्यात आले. ते सर्व त्याच्यासोबत भरपूर जेवले व मनमुरादपणे पिऊन तृप्त झाले.