पृथ्वीवर मानवाची संख्या खूप वाढू लागली आणि त्यांना कन्या झाल्या. परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही, कारण ते दैहिक आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.” त्या दिवसात—आणि नंतरच्या काळातही—महाबलाढ्य मानव पृथ्वीवर वास करीत होते, जेव्हा परमेश्वराच्या पुत्रांनी मानवकन्यांशी विवाह केला, त्यांना संतती झाली. तेच जुन्या काळातील समर्थ आणि प्रसिद्ध मानव झाले. पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.” परंतु नोआहवर याहवेहची कृपादृष्टी झाली. नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा. नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले. परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती. जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे. तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे. त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर. मी पृथ्वी महापुराने भरून टाकणार आहे आणि आकाशाखाली ज्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक सजीव प्राण्याचा मी नाश करणार आहे. पृथ्वीवर जे काही आहे त्याचा नाश होईल. परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील. तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये. प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.” परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.
उत्पत्ती 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 6:1-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ