2
याहवेहचा पर्वत
1यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:
2पण शेवटच्या दिवसात
याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच
असे स्थापित केले जाईल;
सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल,
आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.
3अनेक लोक येतील आणि म्हणतील,
“चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे,
याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ.
ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील,
म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.”
कारण सीयोनमधून नियमशास्त्र,
यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.
4ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील,
आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील.
ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील,
व भाल्यांचे आकडे बनवतील.
एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही,
तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.
5याकोबाच्या वंशजा ये,
आपण याहवेहच्या प्रकाशात चालू.
याहवेहचा दिवस
6याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा
तुमच्या लोकांचा त्याग केला आहे,
ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत;
पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात
आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.
7त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे;
त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत.
त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत;
त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.
8सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे;
त्यांच्याच हस्तकृतींनी,
जे त्यांच्या बोटांनी बनविले आहे, त्याला ते नमन करतात.
9म्हणून या लोकांचे पतन केले जाईल
आणि सर्वजण नमविले जातील—
त्यांना क्षमा करू नका.
10याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून
आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास
कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!
11उन्मताची नजर नमविली जाईल,
आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल;
त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
12गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना,
जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे
त्यांना नम्र करण्यासाठी,
सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—
13लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू
आणि बाशान येथील एलावृक्ष,
14उंच उंच पर्वत
आणि सर्व उंच डोंगर,
15प्रत्येक भव्य बुरूज,
प्रत्येक तटबंदीची भिंत,
16तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत#2:16 किंवा तार्शीशचे गलबत
आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.
17मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल
आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल;
त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
18सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.
19जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील
तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून
आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास
लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील
आणि जमिनीतील खाचात लपतील.
20त्या दिवशी लोक
उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या
त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती
चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.
21जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील
तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून
आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास
लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील
डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.
22मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर
ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे.
त्यांना इतका बहुमान का द्यावा?