44
याहवेहने निवडलेले इस्राएल
1“परंतु आता माझ्या सेवका याकोबा,
माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक,
2याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी तुला निर्माण केले व तुला गर्भाशयात घडविले,
आणि जे तुला साहाय्य करतील:
याकोबा, माझ्या सेवका, भिऊ नको,
हे यशुरून#44:2 किंवा इस्राएल जो नीतिमान आहे, ज्याला मी निवडले आहे, घाबरू नको.
3कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन,
आणि शुष्क जमिनीला झरे देईन;
तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन
व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.
4कुरणातील गवतासारखे ते उगवतील
वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील.
5काहीजण म्हणतील ‘मी याहवेहचा आहे’;
तर इतरजण स्वतःला याकोबाच्या नावाने संबोधतील;
आणखी दुसरे आपल्या हातावर ‘याहवेहचा’ असे लिहून
स्वतःचे नाव इस्राएल ठेवतील.
मूर्ती नव्हे तर, याहवेह
6“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक,
याहवेह असे म्हणतात—
मी आदि व अंत आहे.
माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.
7माझ्यासारखे कोणी आहे काय? त्याने ते घोषित करावे.
त्याने तसे जाहीर करावे आणि माझ्यासमोर प्रस्तुत करावे,
मी माझ्या पुरातन लोकांची स्थापना केल्यापासून काय घडले,
आणि पुढे काय होणार आहे
होय, काय घडणार आहे हे त्यांनी सांगावे.
8भिऊ नका, थरथर कापू नका.
मी अशी घोषणा केली नव्हती का व हे फार पूर्वी जाहीर केले नव्हते का?
तुम्ही माझे साक्षीदार आहात. माझ्याशिवाय कोणी दुसरा परमेश्वर आहे काय?
नाही, माझ्याशिवाय दुसरा खडक नाही; माझ्या माहितीत कोणी नाही.”
9कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत,
आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे.
जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत;
ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत.
10जिच्यापासून काहीही लाभ होत नाही
अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो?
11हे करणारे लोक लज्जित होतील;
हे सर्व कारागीर तर केवळ मानव आहेत.
या सर्वांनी एकत्र यावे व सिद्ध करावे;
त्यांना भयभीत करून लज्जित करण्यात येईल.
12लोहार अवजारे घेतो
आणि आपल्या भट्टीपाशी उभा राहून तो काम करतो;
मूर्तीला आकार देण्यासाठी तो हातोडी वापरतो,
त्याच्या बाहूच्या शक्तीने तो त्याला ठोकून घडवितो.
मग त्याला भूक लागते व तो शक्तिहीन होतो;
तो पाणी पीत नाही आणि दुर्बल होतो.
13सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो
आणि त्यावर लेखणीने खुणा करतो;
पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो.
कंपासने त्यावर निशाणी करतो.
त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो,
सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो,
जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल.
14तो गंधसरू तोडतो
किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो,
तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो,
किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो.
15मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो;
काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी,
आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी.
परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो;
तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो.
16अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो;
त्यावर आपले अन्न शिजवितो,
तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो.
आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो,
“अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.”
17आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो;
त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो,
तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो
“माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!”
18ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही;
त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत.
19कोणीही थांबून विचार करीत नाही,
कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे;
यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला,
याच्या कोळशावर मी भाकरही भाजली
व मांस शिजवून ते खाल्ले.
मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय?
मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?”
20असा मनुष्य राख भक्षण करतो;
संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते;
तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही
“ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”
21“हे याकोबा, या गोष्टी आठवणीत ठेव,
इस्राएला, तू माझा सेवक आहेस.
मीच तुला निर्माण केले, तू माझा सेवक आहेस;
इस्राएला, तुला मी विसरणार नाही.
22मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे,
सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत.
माझ्याकडे परत ये,
मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे.”
23अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे;
हे खालील पृथ्वी, गर्जना कर,
हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो,
गायनाचा कल्लोळ उसळू द्या.
कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे.
इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे!
यरुशलेम पुनः रहिवासित होईल
24“याहवेह असे म्हणतात;
तुमचे उद्धारकर्ता, ज्यांनी तुमची गर्भाशयात घडण केली:
मी याहवेह आहे, संपूर्ण आकाश मी एकट्याने पसरले,
मीच सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता,
ज्याने आकाश ताणले,
ज्याने स्वतः पृथ्वी पसरविली,
25खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात
आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात,
जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो
आणि ते निरर्थक बनवितो.
26जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो
आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो,
जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’
यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’
आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’
27जो खोल जलाशयाला म्हणतो, ‘आटून जा,
आणि मी तुमचे झरे कोरडे करेन,’
28कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे
तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल;
तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,”
आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’