47
बाबेलचा पाडाव
1“हे कुमारी खाल्डियन कन्ये,
सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस;
हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी,
सिंहासन सोडून जमिनीवर बस.
तू यापुढे कोमल व नाजूक
म्हणविली जाणार नाहीस.
2जाते घेऊन धान्य दळीत बस;
तुझा बुरखा काढून टाक.
तुझ्या घागर्याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून
ओढ्यातून पायपीट करत जा.
3तुझ्या नग्नतेचे प्रदर्शन होईल,
आणि तुझी लज्जा अनावृत होईल.
मी सूड उगवेन;
मी कोणा मनुष्याला सोडणार नाही.”
4आमचे उद्धारकर्ता—सर्वसमर्थ याहवेह हे ज्यांचे नाव आहे—
तेच इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत.
5“स्तब्ध बस, अंधारात जा,
खास्द्यांच्या नगराची राणी.
तू यापुढे राज्याची महाराणी
म्हणविली जाणार नाहीस.
6मी माझ्या लोकांवर संतापलो होतो
आणि माझ्या वारसांना भ्रष्ट केले;
त्यांना तुझ्या हाती दिले,
पण तू त्यांना थोडीसुध्दा दया दाखविली नाहीस.
वयस्कर लोकांवरही
तू अवघड ओझे लादलेस.
7तू म्हटले, ‘मी सदैव अस्तित्वात आहे—
सर्वकाळाची राणी आहे!’
परंतु तू या गोष्टींचा विचार केला नाहीस
किंवा परिणामी काय होऊ शकेल याकडे लक्ष दिले नाही.
8“अगे चैनबाजीचे वेड असणारी,
सुरक्षितपणे विलासणारी,
आणि स्वतःला म्हणणारी,
‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही.
मी कधीही विधवा होणार नाही
माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’
9पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी,
एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील:
तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील.
येथे तुझे अनेक चेटके
आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही
हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.
10तू तुझ्या दुष्टाईवर भरवसा ठेवला
‘मला कोणी पाहत नाही,’ असे तू म्हणालीस.
तुझ्या ज्ञानाने व शहाणपणाने तुला पथभ्रष्ट केले
जेव्हा तू स्वतःला म्हणालीस,
‘मीच आहे आणि माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.’
11तुझ्यावर आपत्ती कोसळेल
आणि ती हातचलाखी करून कशी उलटावी हे तुला कळणार नाही.
तुझ्यावर संकट कोसळेल
खंडणी भरूनही त्याचे निवारण करता येणार नाही;
जी येईल असे वाटले नाही अशी एक घोर विपत्ती
अकस्मात तुझ्यावर येईल.
12“मग तुझा जादूटोणा व मंत्रतंत्र,
ज्याचा अनेक वर्षापासून परिश्रम करून तू अभ्यास केला, ते चालू दे.
कदाचित तुला यश मिळेल,
कदाचित दहशत निर्माण करशील.
13तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस!
तुझे ज्योतिषी पुढे येवोत,
नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे,
तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.
14ते निश्चितच भुसकटासारखे आहेत;
अग्नी त्यांना भस्म करेल.
ते अग्नीच्या सामर्थ्यापासून
स्वतःचेही संरक्षण करू शकत नाहीत.
हे ऊब देणारे निखारे नाहीत;
ही जवळ बसविणारी शेकोटी नव्हे.
15ते तुझ्यासाठी एवढेच करतील की—
ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास,
आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस,
ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील;
आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.