60
सीयोनचे गौरव
1“ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे,
आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.
2पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे,
आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे,
परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे,
आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.
3राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील,
आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.
4“आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा:
सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे;
तुझे पुत्र दूरवरून येत आहेत,
तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.
5मग तू ते बघशील व उल्हासित होशील,
तुझे अंतःकरण स्पंदेल व आनंदाने फुगून जाईल;
सागराची संपत्ती तुझ्याकडे आणण्यात येईल,
अनेक देशांची समृद्धी तुझ्याकडे येईल.
6उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील,
तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील.
आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन
तुझ्याकडे येतील.
आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.
7केदारचे सर्व कळप तुला दिले जातील
व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील;
ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील,
आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.
8“मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे,
जणू घरट्यांकडे परतणारी कबुतरे?
9निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात;
सर्वात पुढे तार्शीशची गलबते#60:9 किंवा व्यापारी जहाजे आहेत,
तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत,
त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे,
इस्राएलचे पवित्र परमेश्वर
याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी
त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.
10“परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील,
राजे तुझी सेवा करतील.
जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले,
तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.
11तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील,
त्या रात्री वा दिवसा, बंद केल्या जाणार नाहीत,
जेणेकरून अनेक देशातून लोक तुझ्याकडे संपत्ती आणू शकतील—
त्यांचे राजे विजयोत्सवाने मिरवणूक चालवितील.
12जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील,
ती पूर्णपणे उद्ध्वस्त होतील.
13“लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल,
सुरू, देवदारू व भद्रदारू
माझे पवित्रस्थान शोभिवंत करतील;
आणि माझ्या पावलांचे स्थान गौरवशाली करतील.
14तुमच्यावर अत्याचार करणार्यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील;
जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील.
ते तुला याहवेहचे शहर,
आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील.
15“जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता,
तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत,
तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन,
आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन.
16तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील
आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल.
तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता
मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.
17कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने,
तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन,
लाकडाच्या ऐवजी कास्य,
आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन.
शांतता हे तुझ्यावरील अधिकारी,
व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.
18यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार,
किंवा अधोगती व विध्वंस तुझ्या सीमेत ऐकिवात येणार नाही,
परंतु तुझ्या तटबंदीस तू तारण
व तुझ्या वेशींना स्तुती असे म्हणशील.
19यापुढे दिवसा सूर्यप्रकाश
व चंद्राचे तेज तुझ्यावर पडणार नाही,
कारण तुझे याहवेहच तुझा अक्षय प्रकाश होतील
व तुझे परमेश्वर तुझा गौरव होतील.
20तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही,
आणि तुझ्या चंद्राचा कधी ऱ्हास होणार नाही.
कारण याहवेहच तुझा सर्वकाळचा प्रकाश असतील;
आणि तुझे शोकाचे दिवस संपतील.
21मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील
आणि ते त्यांच्या भूमीचे सर्वकाळचे मालक बनतील.
कारण ते मी रोपलेली फांदी आहेत,
माझा गौरव प्रकट करण्यासाठी
माझी हस्तकृती आहेत.
22तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील,
सर्वात लहान एक बलाढ्य राष्ट्र होईल,
मी याहवेह आहे;
योग्य त्या समयी, मी हे सर्व वेगाने घडवेन.”