14
शमशोनाचा विवाह
1शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक सुंदर पलिष्टी स्त्री पाहिली. 2तिथून परत आल्यावर, तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, “मी तिम्नाह इथे एक पलिष्टी स्त्री पाहिली आहे; मला ती माझी पत्नी करून द्या.”
3त्याच्या आईवडिलांनी प्रत्युत्तर दिले, “तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या सर्व लोकांमध्ये स्वीकार करण्यायोग्य स्त्री नाही काय? सुंता न झालेल्या पलिष्टी लोकांकडे पत्नी मिळविण्यासाठी जावे काय?”
परंतु शमशोनाने आपल्या वडिलांना म्हटले, “मला तीच हवी आहे. ती माझ्यासाठी योग्य आहे.” 4(त्याच्या आईवडिलांना हे कळले नाही की हे याहवेहकडून आहे, जे पलिष्ट्यांना विरोध करण्याच्या संधीची वाट पाहत होते; कारण त्यावेळी ते इस्राएलावर राज्य करीत होते.)
5शमशोन त्यांच्या आईवडिलांसोबत खाली तिम्नाह येथे गेला. ते तिम्नाह येथील द्राक्षांच्या मळ्यांजवळ पोहोचले असता, अचानक एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला. 6याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला जेणेकरून त्याने आपल्या हाताने एखादी शेळी फाडावे त्याप्रमाणे त्याने त्या सिंहाचे जबडे फाडून ते अलग केले. परंतु त्याने त्याबद्दल आपल्या वडिलांना किंवा आईला काहीही सांगितले नाही. 7नंतर शमशोन खाली गेला आणि त्या स्त्रीसह बोलला आणि ती त्याला प्रिय वाटली.
8काही वेळानंतर, जेव्हा तो तिच्यासोबत विवाह करण्यासाठी परत आला, आडवाट करून तो सिंहाचे कलेवर पाहण्यास गेला आणि त्यामध्ये त्याने मधमाश्यांचा थवा आणि काही मध पाहिला. 9त्याने आपल्या हाताने तो मध घेतला आणि वाटेने मध खात खात तो पुढे गेला. जेव्हा तो आपल्या आईवडिलांजवळ पोहोचला तेव्हा त्यांनाही काही मध दिला आणि त्यांनीही तो खाल्ला. परंतु तो त्याने सिंहाच्या कलेवरातून आणला आहे, हे त्याने त्यांना सांगितले नाही.
10आता त्याचे वडील त्या स्त्रीला बघायला खाली गेले. आणि तिथे शमशोनाने तरुणांच्या प्रथेप्रमाणे मेजवानी दिली. 11जेव्हा लोकांनी त्याला पाहिले, तेव्हा त्यांनी तीस लोकांना त्याचे साथीदार म्हणून निवडले.
12शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला एक कोडे सांगतो, तुम्ही मला सणाच्या सात दिवसांत उत्तर देऊ शकलात तर मी तुम्हाला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे देईन. 13जर तुम्ही मला उत्तर सांगू शकत नसाल, तर तुम्ही मला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे द्याल.”
“तुझे कोडे आम्हाला सांग,” ते म्हणाले. “चला ऐकू या.”
14त्याचे कोडे असे होते
“खाणार्यातून अन्न;
प्रबळातून माधुर्य ते काय?”
तीन दिवसापर्यंत ते उत्तर देऊ शकले नाही.
15चौथ्या दिवशी#14:15 काही मूळ प्रतींनुसार सातव्या ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?”
16तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.”
तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितलेले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?” 17मेजवानीचे संपूर्ण सात दिवस ती रडली. त्यामुळे सातव्या दिवशी शेवटी त्याने तिला सांगितले, कारण ती त्याच्यावर फार दबाव टाकत होती. तिने जाऊन आपल्या लोकांना कोडे समजावून सांगितले.
18सातव्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी नगरातील लोक त्याला म्हणाले,
“मधापेक्षा गोड काय आहे?
सिंहापेक्षा बलवान काय आहे?”
शमशोन त्यांना म्हणाला,
“तुम्ही माझ्या कालवडीने नांगरणी केली नसती,
तर तुम्ही माझे कोडे सोडविले नसते.”
19नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला. 20आणि शमशोनची पत्नी त्याच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या त्याच्या एका सोबत्याला देण्यात आली.