3
1कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली 2(हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा): 3ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी. 4याहवेहने मोशेद्वारे त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञांचे पालन ते करतील की नाही याबाबत परीक्षा पाहण्यासाठी इस्राएली लोकांना मागे राहू दिले होते.
5इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले. 6इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.
ओथनिएल
7इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले. 8याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले. 9परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. 10याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता#3:10 किंवा पुढारी झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला. 11त्यामुळे केनाजचा पुत्र ओथनिएल मरेपर्यंत देशात चाळीस वर्षे शांतता होती.
एहूद
12एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले. 13एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर#3:13 म्हणजे यरीहो ताब्यात घेतले. 14इस्राएली लोक अठरा वर्षे मोआबचा राजा एग्लोनचे गुलाम होते.
15इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले. 16आता एहूदाने दुधारी तलवार बनविली, जी अर्धा मीटर#3:16 अंदाजे 45 सें.मी लांब होती, ती त्याने त्याच्या झग्याखाली उजव्या मांडीवर बांधली. 17त्याने मोआबच्या राजा एग्लोनाच्या समोर रसद सादर केली, जो खूप गलेलठ्ठ मनुष्य होता. 18एहूदाने रसद सादर केल्यानंतर, ज्यांनी ते वाहून नेले होते त्यांना त्यांच्या मार्गावर परत पाठविले. 19परंतु गिलगालजवळील दगडी मूर्तीजवळ पोहोचल्यावर तो स्वतः एग्लोनकडे परत गेला आणि म्हणाला, “महाराज, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गुप्त संदेश आहे.”
राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आम्हाला एकटे सोडा!” आणि ते सर्व निघून गेले.
20मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच, 21एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली. 22पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती. 23मग एहूद बाहेर ओसरीत गेला; त्याने त्याच्यामागे वरच्या खोलीचे दरवाजे बंद केले आणि त्यांना कुलूप लावले.
24तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.” 25ते लाजिरवाणे वाटेपर्यंत थांबले, परंतु जेव्हा त्यांनी खोलीचे दार उघडले नाही, तेव्हा त्यांनी किल्ली घेतली आणि दार उघडले. तिथे त्यांना आपला स्वामी जमिनीवर मरून पडलेला दिसला.
26ते तिथे वाट पाहत असता, एहूद पळून गेला. दगडी मूर्तीपलीकडे सेईराह येथे जाऊन पोहोचला. 27तो तिथे गेल्यावर त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले आणि इस्राएली लोक त्याच्यासोबत डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि त्याने त्यांचे नेतृत्व केले.
28त्याने आदेश दिला, “माझ्यामागे या, कारण याहवेहने तुमचे शत्रू मोआबी लोक तुमच्या हाती दिले आहेत.” मग ते त्याच्या पाठोपाठ खाली गेले आणि त्यांनी मोआब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणासही पलीकडे जाऊ दिले नाही. 29त्यावेळी त्यांनी सुमारे दहा हजार मोआबी लोक मारले. हे सर्व धिप्पाड आणि बलवान पुरुष होते; त्यापैकी एकही सुटू शकला नाही. 30त्या दिवशी मोआबी लोक इस्राएली लोकांच्या अधीन आले आणि त्यानंतर देशाला ऐंशी वर्षे शांतता लाभली.
शमगार
31एहूदनंतर अनथाचा पुत्र शमगार आला, त्याने बैलाच्या अंकुशाने सहाशे पलिष्ट्यांना मारले. त्यानेही इस्राएलला वाचविले.