6
गिदोन
1इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले. 2कारण मिद्यानाचे सामर्थ्य अत्यंत जुलमी असल्यामुळे, इस्राएली लोकांनी डोंगरातील फटी, गुहा आणि किल्ल्यांमध्ये स्वतःसाठी आश्रयस्थान तयार केले. 3जेव्हा कधी इस्राएली लोक आपल्या पिकांची पेरणी करीत, तेव्हा मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील लोक देशावर आक्रमण करत असत. 4त्यांनी तेथील जमिनीवर तळ ठोकला आणि गाझापर्यंत पिकांची नासाडी केली आणि इस्राएलसाठी मेंढ्या, गुरे, गाढवेही त्यांनी जिवंत ठेवली नाहीत. 5ते टोळांच्या समुहासारखे त्याचे तंबू आणि त्यांचे पशुधन घेऊन आले. त्यांना किंवा त्यांचे उंट मोजणे शक्य नव्हते; त्यांनी ती भूमी उद्ध्वस्त करण्यासाठी आक्रमण केले. 6अशा रीतीने या मिद्यानी लोकांमुळे इस्राएलाची अवस्था इतकी निकृष्ट व कंगाल झाली, की ते मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले.
7मिद्यान्यांमुळे जेव्हा इस्राएली लोक मदतीसाठी याहवेहचा धावा करू लागले, 8त्यांनी एक संदेष्टा पाठवला, तो म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले. 9मी तुम्हाला इजिप्तमधील लोकांच्या हातातून सोडविले आणि जे तुमच्याशी क्रूरपणे वागत, त्या सर्व लोकांच्या हातून सोडविले आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापुढून घालवून त्यांचा देश तुम्हाला दिला. 10मी तुम्हाला म्हटले, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका. परंतु तुम्ही माझे ऐकले नाही.”
11याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता. 12जेव्हा याहवेहचा दूत गिदोनाच्या पुढे प्रगट झाला आणि त्यास म्हणाला, “हे बलवान सैनिका, याहवेह तुझ्याबरोबर आहेत.”
13गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.”
14याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?”
15गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.”
16याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.”
17गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. 18मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.”
आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.”
19गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून#6:19 अंदाजे 16 कि.ग्रॅ. खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले.
20परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले, 21तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला. 22जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!”
23परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”
24म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.
25त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा#6:25 किंवा संपूर्ण वाढ झालेला दुसरा गोर्हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्या अशेरा देवीचा खांब#6:25 म्हणजे अशेरा देवीचे लाकडी चिन्ह तोडून टाक. 26नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी#6:26 किंवा दगडाच्या पायर्या बांधणे बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्हा#6:26 किंवा संपूर्ण वाढ झालेला अर्पण कर.”
27यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.
28दुसर्या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्या गोर्ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले!
29ते एकमेकांना विचारू लागले, “हे कोणी केले असावे?”
शोध घेतल्यावर त्यांना सांगण्यात आले, “योआशाचा पुत्र गिदोनाने ते केले होते.”
30योआशाला नगरवासी मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “तुझ्या पुत्राला बाहेर आण; बआल दैवताच्या वेदीचा अपमान केल्याबद्दल व तिच्याजवळील अशेरामूर्ती फोडल्याबद्दल त्याने मेलेच पाहिजे.”
31परंतु योआशाने त्याच्या आजूबाजूच्या विरोधी जमावाला उत्तर दिले, “तुम्ही बआलची बाजू मांडणार आहात का? तुम्ही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहात का? जो कोणी त्याच्यासाठी लढेल त्याला सकाळपर्यंत जिवे मारावे! जर बआल खरोखरच देव असता तर, जेव्हा कोणी त्याची वेदी तोडतो तेव्हा तो स्वतःचा बचाव करू शकला असता.” 32म्हणून गिदोनाने बआल दैवताची वेदी विध्वंस केली, त्या दिवशी त्यांनी त्याला “यरूब्बआल” असे नाव दिले, त्याचा अर्थ, “बआल दैवतानेच त्याचा विरोध करावा,” असा होता.
33त्यानंतर लवकरच मिद्यानी, अमालेकी आणि इतर पूर्वेकडील शेजारी राष्ट्रांची सैन्ये एकत्रित झाली. त्यांनी यार्देन पार केली व येज्रीलच्या खोर्यात तळ दिला. 34तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले. 35त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.
36गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल— 37पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.” 38आणि अगदी तसेच घडून आले. दुसर्या दिवशी सकाळी गिदोन उठला; त्याने ती लोकर दाबली आणि तिच्यातील दहिवर पिळले—एक वाटीभर पाणी काढले.
39नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.” 40त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.