YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 18

18
कुंभाराच्या घरी
1याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: 2“कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.” 3म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. 4परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले.
5तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले. 6ते म्हणाले, “हे इस्राएला, या कुंभाराने आपल्या मातीचे केले तसे मला तुझे करता येणार नाही काय? कुंभाराच्या हातात माती असते तसे इस्राएला, तुम्ही माझ्या हातात आहात,” असे याहवेह जाहीर करतात. 7एखाद्या राष्ट्राचा भेद पाडावा, त्याचे निर्मूलन करावे, व समूळ नाश करावा, असे जेव्हा मी जाहीर करतो, 8तेव्हा ज्यास मी सावध केले त्या राष्ट्राने आपल्या कुमार्गाबद्दल पश्चात्ताप केला, तर मी त्यांच्यावर दया करेन व माझ्या योजनेप्रमाणे त्यांचा नाश करणार नाही. 9आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली, 10आणि जर त्यांनी माझ्या दृष्टीने पाप केले आणि माझी आज्ञा पाळली नाही, तर मी त्याला आशीर्वाद देण्यासाठी पुनर्विचार करेन.
11“म्हणून आता यहूदीयातील लोकांना आणि जे यरुशलेममध्ये राहतात, त्यांना सांग, ‘याहवेहचा संदेश ऐका: पाहा! मी तुमच्यासाठी विपत्ती तयार करीत आहे आणि तुमच्याविरुद्ध योजना आखीत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण दुष्ट मार्गापासून वळा, व तुमचे मार्ग व तुमचे आचरण सुधारा.’ 12परंतु त्यांनी उत्तर दिले, ‘हे उपयोगाचे नाही. आम्ही आमच्या आखलेल्या योजनेप्रमाणे करीत राहू; आम्ही आमच्या हृदयाच्या हट्टीपणा व दुष्टपणानेच चालणार.’ ”
13म्हणून याहवेह असे म्हणतात:
“आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा:
असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय?
इस्राएलाच्या कुमारिकेने
एवढे भयंकर कर्म केले आहे.
14लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ
कधी वितळतो का?
दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी
कधी वाहण्याचे थांबते काय?
15तरीसुद्धा माझे लोक मला विसरले;
ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात,
ते त्यांना अडखळत चालावयास लावतात
ते पूर्वजांचे मार्ग आहेत.
जे मार्ग नीट बांधलेले नाही,
म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.
16त्यांचा देश भयानकतेचे,
आणि नेहमीसाठी तिरस्काराचे उदाहरण होईल;
येजा करणाऱ्या सर्वांना हे बघून दहशत भरेल
आणि ते आश्चर्याने आपली डोकी हालवितील.
17जसा पूर्वेकडील वारा धूळ उडवितो,
त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे उडवेन;
त्यांच्या दुर्दशेच्या दिवशी
मी माझे मुख नव्हे, तर त्यांच्याकडे पाठ फिरवेन.”
18त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”
19“हे याहवेह, माझे ऐका,
माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका!
20चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का?
माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे.
आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो
आणि त्यांच्यावतीने बोललो
जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.
21म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या;
त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा.
त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या;
त्यांचे पुरुष मृत्यू पावोत,
व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.
22जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील
तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत,
कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे
आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.
23परंतु याहवेह, मला मारण्याच्या
त्यांच्या सर्व युक्त्या तुम्ही जाणता.
त्यांच्या अपराधांची क्षमा करू नका,
किंवा त्यांचे पाप दृष्टीपुढून पुसून जाऊ नये.
ते तुमच्यापुढे उलटून पडोत;
तुम्ही आपल्या क्रोधाच्या वेळी त्यांचा समाचार घ्या.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन