YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 25

25
बंदिवासाची सत्तर वर्षे
1यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला. 2मग यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाच्या सर्व लोकांना व यरुशलेमच्या रहिवाशांना म्हणाला: 3गेली तेवीस वर्षे—यहूदीयाचा राजा आमोनचा पुत्र योशीयाह याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षापासून आजपर्यंत—याहवेह मला त्यांचे संदेश देत आले आहेत आणि मी तेच संदेश परत परत तुम्हाला सांगत आलो आहे, पण तुम्ही ते ऐकले नाहीत.
4पुनः पुनः याहवेहने आपले सर्व सेवक संदेष्टे तुमच्याकडे पाठविले, पण तुम्ही ऐकावयाचे नाकारले व त्याकडे दुर्लक्ष केले. 5त्यांनी तुम्हाला संदेश दिला: “तुम्ही प्रत्येकजण तुमच्या दुष्ट मार्गापासून व जी दुष्कर्मे करीत आहात त्यापासून मागे फिरा, तरच याहवेहने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्वकाळासाठी दिलेल्या या देशात तुम्ही राहाल. 6इतर दैवतांची सेवा करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू नका व त्यांची उपासना करू नका; तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकवू नका. तर मी तुम्हाला अपाय करणार नाही.”
7याहवेह म्हणतात, “पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि तुमच्या हस्तकृतींमुळे माझा क्रोध भडकविला व सर्व संकटे तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली.”
8म्हणून आता सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तुम्ही माझी वचने ऐकली नाही, 9मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात, 10“त्यांचे हर्ष व त्यांच्या आनंदोत्सवाचे स्वर, वर आणि वधूंचे स्वर, त्यांच्या जात्यांचे आवाज व त्यांच्या दिव्यांचा प्रकाश मी नाहीसा करेन. 11हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील.
12“गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन, 13या पुस्तकात मी जाहीर केलेले सर्व भयानक अनर्थ आणि यिर्मयाहने सर्व राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाणीत केलेल्या शिक्षा, मी या खाल्डियनांच्या देशावर आणेन. 14अनेक राष्ट्रे व महान राजे त्यांना गुलाम करतील. त्यांनी माझ्या लोकांचा कृत्याद्वारे व हस्तकृतीद्वारे ज्या प्रमाणात छळ केला, त्याच प्रमाणात मी त्यांना शासन करेन,” याहवेह असे म्हणतात.
परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला
15याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव. 16जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.” 17तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले:
18यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;
19इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;
20त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे;
व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);
21एदोम, मोआब व अम्मोन;
22तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे;
समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;
23ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात#25:23 किंवा जे त्यांच्या कपाळावरील केस कापतात असलेले;
24आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;
25जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;
26तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे;
सरतेशेवटी शेशाकचा#25:26 बाबिलोन राजा या प्याल्यातून पिईल.
27“त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’ 28हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल! 29माझे नाव धारण करणाऱ्या नगरावर मी विपत्ती आणत आहे, आणि मग तुम्ही शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हाला शिक्षा चुकवता येणार नाही, कारण पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांविरुद्ध मी तलवार चालविणार आहे, असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.’
30“म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग:
“ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील;
त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील
आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील
पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध.
द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील,
31हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल,
कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील;
ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील
सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ”
याहवेहची ही घोषणा आहे.
32सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात,
“पाहा! विपत्ती पसरत आहे
एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात;
पृथ्वीच्या टोकापासून
एक भयंकर वादळ उठत आहे.”
33त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील.
34अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा;
मानवजातीच्या कळपांच्या पुढार्‍यांनो, धुळीत लोळा.
कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे;
मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.
35मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही,
पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही.
36मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका,
कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका!
याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत.
37आता शांत कुरणे उजाड होतील
याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील.
38सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील,
आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे#25:38 किंवा रागामुळे
आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे
त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन