30
इस्राएलचे पुनर्वसन
1याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: 2“इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव. 3याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन#30:3 किंवा माझ्या इस्राएल आणि यहूदीयाच्या लोकांची समृद्धी मी परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”
4इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात: 5“याहवेह म्हणतात:
“ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे—
शांती नव्हे, तर दहशत.
6विचारून पाहा:
पुरुष मुले प्रसवू शकतात काय?
मग प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांप्रमाणे
आपल्या पोटावर हात ठेऊन
मेल्यागत फिक्के पडलेल्या चेहऱ्याचे बलवान पुरुष मला का दिसत आहेत?
7हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल!
इतर कोणताही दिवस असा नसेल.
याकोबासाठी तो संकटकाळ असेल.
पण तो यातून वाचून बाहेर पडेल.
8“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात,
‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन,
त्यांच्या बेड्या तोडेन,
आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;
9याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा,
ज्याला मी त्यांच्यातून उभारेन,
ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील!
10“ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका;
हे इस्राएला, निराश होऊ नको,’
याहवेह असे जाहीर करतात.
‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून,
व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन.
याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल
आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’
11कारण याहवेह जाहीर करतात,
‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन.
जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली,
त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला,
तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही.
मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित;
तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’
12“याहवेह असे म्हणतात:
“ ‘तुझी जखम असाध्य आहे,
तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे.
13तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही,
तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही,
तुला आरोग्य प्राप्त होणार नाही.
14तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत;
त्यांना तुझी चिंता नाही;
एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे
निर्दयागत मी तुला शासन केले,
कारण तुझा अपराध फार मोठा आहे
तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.
15तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस,
तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का?
कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत
म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.
16“ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील;
तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील.
ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील;
ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.
17मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन
आणि तुझ्या जखमा बर्या करेन,’ याहवेह जाहीर करतात,
‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती,
सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’
18“परंतु याहवेह असे म्हणतात:
“ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन,
आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन;
त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल
आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल.
19तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील
आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील.
मी त्यांची लोकसंख्या वाढवेन,
पण त्यात घट होऊ देणार नाही;
मी त्यांना प्रतिष्ठित करेन,
पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.
20त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील,
त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील;
त्यांचा छळ करणार्या सर्वांना मी शिक्षा करेन.
21त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल;
त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल.
मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल,
कारण माझ्या निकट येण्यासाठी
त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’
असे याहवेह जाहीर करतात.
22‘तुम्ही माझे लोक व्हाल
व मी तुमचा परमेश्वर होईन.’ ”
23पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा.
त्याचा प्रकोपात स्फोट होईल,
दुष्टांच्या मस्तकावर
ते एका वावटळीप्रमाणे येईल.
24याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश
पूर्ण झाल्याशिवाय
त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही.
पुढे येणाऱ्या दिवसात
तुला हे कळेल.