यिर्मयाह 49
49
अम्मोनी लोकांविषयी संदेश
1अम्मोनी लोकांविषयी:
याहवेह असे म्हणतात:
“इस्राएलला पुत्र नाहीत काय?
इस्राएलला वारस नाहीत काय?
अम्मोनी राजाने#49:1 दैवत मोलेकाने गादचा ताबा का घेतला आहे?
त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?
2याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत,
जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन,
ते नासाडीचा ढिगारा होईल,
आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील.
मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील.
मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले,
त्या सर्वांना ती हाकलून लावेल.”
असे याहवेह म्हणतात.
3“हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे!
राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा!
गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा;
भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा,
कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्यांसह
दैवत मोलेख बंदिवासात जाईल.
4तुझ्या खोर्यांचा तू गर्व का करतेस,
सुपीक खोर्यांची तू बढाई का मारते?
हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके,
तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस,
माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?
5तुझ्या सर्व बाजूने
मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन,
असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल,
त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.
6“परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,”
याहवेह जाहीर करतात.
एदोमी लोकांविषयी संदेश
7एदोम्यांविषयी:
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का?
शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय?
त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?
8ददान प्रदेशातील रहिवाशांनो,
मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा,
कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन,
तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.
9जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले,
तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय?
जर रात्रीच्या वेळी चोर आले,
तर ते त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय?
10परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन;
मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन,
म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही.
त्याचे शस्त्रधारी पुरुष,
तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत,
म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,
11‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन.
आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ”
12याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे. 13याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”
14मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे;
“एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या!
युद्ध करण्यास सज्ज व्हा!”
असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता.
15“आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन
व सर्व मानवजात तुमचा तिरस्कार करतील.
16तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन
आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे,
तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता,
तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत.
जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत,
तरी तिथून मी तुला खाली आणेन.
असे याहवेह जाहीर करतात.
17एदोम दहशतीचे ठिकाण होईल;
त्याच्या जवळून जाणारा कोणीही
त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.
18याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा
त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला,
म्हणजे तिथे कोणी राहणार नाही;
त्यात लोक वस्ती करणार नाहीत.
19“यार्देन नदीच्या झुडूपातून
सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे,
एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन.
मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे?
माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे?
कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”
20एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका.
तेमानमध्ये राहणार्या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या.
त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल.
त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.
21एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल;
त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल.
22पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल,
व बस्रावर आपले पंख पसरेल.
त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे
वेणा देणार्या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.
दमास्कसविषयी संदेश
23दिमिष्क विषयी:
“हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत,
कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे.
ते निराश झाले आहेत,
एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.
24दिमिष्क दुर्बल झाले आहे,
पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे
आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे;
जशा प्रसूत होणार्या वेदना स्त्रियांना घेरतात,
त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.
25जी नगरी मला प्रसन्न करते,
त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?
26निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील;
तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,”
असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
27“आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन
व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”
केदार व हासोर यांच्याविषयी संदेश
28केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी:
याहवेह असे म्हणतात:
“सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा
आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.
29त्यांचे कळप व त्यांचे तंबू उचलून नेण्यात येतील;
त्यांची आश्रयस्थाने, सर्व घरगुती सामान व उंटही
हस्तगत केले जातील.
लोक त्यांच्यावर ओरडून म्हणतील,
‘प्रत्येक बाजूला आतंक पसरला आहे!’
30“लवकर दूर पळा!
हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,”
कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे;
नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे,
याहवेह जाहीर करतात.
31“सज्ज हो आणि सुखात राहणार्या राष्ट्रांवर हल्ला कर,
जे आत्मविश्वासाने जगतात,”
याहवेह जाहीर करतात.
“ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत;
त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात.
32त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील,
व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील.
या मूर्तिपूजक#49:32 किंवा जे त्यांच्या कपाळावरील केस कापतात लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन
मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन.
याहवेह असे जाहीर करतात.
33हासोरात कोल्हे संचार करतील,
ते कायमचे ओसाड होईल.
तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही;
मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”
एलामविषयी संदेश
34यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.
35सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“मी एलामचा धनुष्य तोडणार आहे,
जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे.
36मी एलामच्या विरुद्ध चारही दिशातील वार्याला आणेन;
ते आकाशाच्या चारही कोपऱ्यातून येतील;
मी त्यांना चारही दिशातील वार्यावर पसरवून टाकेन,
असे एकही राष्ट्र नसेल
जिथे एलामचे निर्वासित नसतील.
37जे एलामचा वध करू इच्छितात,
त्या त्यांच्या शत्रूदेखत मी पांगापांग करेन;
मी त्यांच्यावर अरिष्ट आणेन,
माझा भयंकर क्रोधही आणेन,”
असे याहवेह जाहीर करतात.
“मी त्यांचा समूळ नाश करेपर्यंत
त्यांचा तलवारीने पाठलाग करेन.
38मी माझे राजासन एलाम येथे स्थापन करेन
मी तिचा राजा व तिचे सरदार यांचा नाश करेन.
असे याहवेह जाहीर करतात.
39“तरी येत्या दिवसात
मी एलामची समृद्धी परत आणेन,”
याहवेह जाहीर करतात.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 49: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.