यिर्मयाह 52
52
यरुशलेमचा पाडाव
1सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. 2यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. 3यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले.
आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.
4म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले. 5सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.
6चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. 7तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सर्व सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही ते रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून ते अराबाह#52:7 यार्देनच्या खोऱ्याकडे च्या दिशेने पळून गेले. 8परंतु बाबिलोनच्या सैनिकांनी सिद्कीयाह राजाचा पाठलाग केला आणि त्याला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, 9आणि तो पकडला गेला.
त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. 10बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला. 11मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.
12बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला. 13त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत त्याने जाळून भस्म केली. 14रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटे पाडून टाकली. 15नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने काही अगदी गरीब लोक, शहराच्या विध्वंसातून वाचलेले लोक, आणि जे बाबेलच्या राजाला शरण गेले होते त्यांना व बाकीचे कारागीर यांना बंदिवासात नेले. 16परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.
17बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले. 18त्यांनी भांडी, फावडे, चिमटे, शिंपडण्याची भांडी आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. 19रक्षक दलाच्या अधिकार्याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते.
20याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. 21प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता;#52:21 अंदाजे 8.1 मीटर उंच आणि 5.4 मीटर घेर प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते. 22एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात#52:22 अंदाजे 2.3 मीटर उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता. 23खांबाच्या चारही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती; राहिलेल्या भागावरच्या जाळीच्या नक्षीकामात एकूण शंभर डाळिंबे कोरली होती.
24रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपाल यांना बंदिवान म्हणून नेले. 25जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि सात राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने काढून नेले. 26रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. 27हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला.
याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.
28बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी:
सातव्या वर्षी,
3,023 यहूदी;
29बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी,
832 लोक यरुशलेममधून;
30नबुखद्नेस्सरच्या तेविसाव्या वर्षी,
पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने 745 यहूदी लोक बाबेलला नेले.
असे एकूण 4,600 लोक नेण्यात आले.
यहोयाखीनची मुक्तता
31यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले. 32तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. 33यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. 34यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 52: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.