13
1“माझ्या नेत्रांनी हे सर्व पाहिले आहे,
माझ्या कानांनी ते ऐकले आणि समजले.
2जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे;
मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही.
3पण मी सर्वसमर्थाशी बोलावे
आणि माझा वाद परमेश्वरासमोर मांडावा असे मी इच्छितो.
4तुम्ही तर मला लबाड्यांनी कलंकित करता;
तुम्ही सर्व अयोग्य वैद्य आहात!
5तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल!
कारण त्यातच तुमचे शहाणपण आहे.
6आता माझा वाद ऐकून घ्या;
माझ्या ओठांच्या विनंतीकडे कान द्या.
7परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का?
त्यांच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण कराल का?
8तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का?
परमेश्वराच्या वतीने त्यांचा वाद तुम्ही कराल काय?
9त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय?
जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय?
10जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल
तर परमेश्वर तुमच्याकडून निश्चितच हिशोब मागेल.
11त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का?
त्यांचे भय तुम्हावर पडणार नाही का?
12तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे;
तुमचे रक्षण हा मातीचा बचाव आहे.
13“आता गप्प राहा व मला बोलू द्या;
मग माझ्यावर जे यावयाचे ते येवो.
14मी स्वतःला धोक्यात का टाकू
आणि माझे जीवन माझ्याच हातात का घेऊ?
15जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन;
व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.
16खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे,
कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही!
17मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका;
माझे शब्द तुमच्या कानावर पडू द्या.
18मी माझा वाद तयार केला आहे,
मला माहीत आहे की मी दोषमुक्त ठरेन.
19माझ्याविरुद्ध कोणी आरोप करेल काय?
केलाच तर, मी शांत राहीन आणि मरून जाईन.
20“हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या,
आणि मग मी तुमच्यापासून लपणार नाही:
21माझ्यावरील आपला हात दूर करा,
आणि तुमच्या धाकाने मला आणखी घाबरवू नका.
22मला आवाज द्या आणि मी उत्तर देईन,
किंवा मी बोलेन आणि तुम्ही मला उत्तर द्या.
23मी किती चुका आणि पाप केलेत?
माझे पाप आणि माझे अपराध मला दाखवा.
24तुम्ही आपले मुख का लपविता
आणि मला आपला शत्रू का मानता?
25वार्याने उडून जाणार्या पानाला तुम्ही छळणार का?
कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का?
26कारण माझ्याविरुद्ध तुम्ही कटुत्वाच्या गोष्टी लिहिता,
आणि माझ्या तारुण्यातील पातकांची शिक्षा मला देता.
27तुम्ही माझ्या पायात बेड्या घालता;
माझ्या पायांच्या तळव्यांना चिन्ह करून
माझ्या सर्व मार्गावर तुम्ही लक्ष ठेवले आहे.
28“सडलेल्या वस्तूप्रमाणे,
कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे मनुष्य नष्ट होतो.