27
इय्योबाचे त्याच्या मित्रांशी शेवटचे भाषण
1इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
2“ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे,
आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो,
3की जोपर्यंत मी जिवंत आहे,
आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे,
4तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत,
आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही.
5मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे;
मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही.
6माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही;
मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही.
7“माझे शत्रू दुष्टांप्रमाणे,
आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत!
8कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले,
आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे?
9जेव्हा त्यांच्यावर संकट येईल,
तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?
10सर्वसमर्थामध्ये त्यांना संतोष मिळणार काय?
सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?
11“परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी मी तुम्हाला शिकवेन;
सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही.
12तुम्ही सर्वांनी स्वतः हे बघितले आहे,
मग या निरर्थक गोष्टी का बोलता?
13“दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे,
कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:
14त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार;
त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.
15आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील,
आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.
16दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो
व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,
17जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील,
आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.
18त्याने बांधलेले घर पतंगाच्या कोशाप्रमाणे आहे,
पहारेकर्याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.
19धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो;
पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.
20संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात;
रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.
21पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो;
त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.
22तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो
तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल.
23टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल
आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.”