30
1“परंतु आता जे माझ्याहून वयाने लहान आहेत,
ते माझी चेष्टा करतात,
ज्यांच्या वडिलांना मी तिरस्काराने
मेंढ्यांचे राखण करणार्या कुत्र्यांबरोबर बसविले.
2त्यांच्या हातच्या सामर्थ्याचा मला काय लाभ,
जेव्हा त्यांचा जोम त्यांच्यात राहिलाच नाही?
3भुकेने ते निस्तेज पडले आहेत,
रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर
ते वणवण भटकले.
4ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते,
केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते.
5त्यांना समाजातून घालवून दिले होते,
जसे चोरांवर ओरडावे तसे त्यांच्यामागून लोक ओरडत होते.
6त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये,
खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले.
7झुडपांमधून ते कर्कश आवाजात ओरडत
आणि झुडपाखाली दाटून बसत.
8आधार नसलेल्या आणि अपरिचित पिलावळी सारखे
त्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले होते.
9“आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात;
मी त्यांच्या चर्चेचा विषय झालो आहे.
10ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात;
माझ्या तोंडावर थुंकण्यास ते संकोच करीत नाहीत.
11आता तर परमेश्वरानेच माझ्या कमानीची तार सैल सोडून मला पीडले आहे,
माझ्यासमोर ते अनियंत्रितपणे वागतात.
12माझ्या उजव्या बाजूने घोळक्याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात;
आणि माझ्या वाटेवर जाळे पसरवितात,
माझ्याविरुद्ध ते उतरणी बांधतात.
13ते माझा मार्ग अडवितात;
माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते.
ते म्हणतात, ‘याला साहाय्य करणारा कोणीही नाही.’
14खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात;
माझा नाश करण्यासाठी भग्नावशेषातून ते माझ्यावर लोंढ्यासारखे धावून येतात.
15भयाने मला ग्रासून टाकले आहे;
माझा मान सन्मान वार्याप्रमाणे नष्ट झाला आहे,
आणि माझी सुरक्षा ढगाप्रमाणे सरून गेली आहे.
16“आणि आता माझे जीवन संपुष्टात आले आहे;
पीडेच्या काळाने माझ्यावर पकड घट्ट केली आहे.
17रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात;
मला छळणार्या वेदना थांबत नाहीत.
18परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत;
वस्त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत.
19परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे,
मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे.
20“हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत;
मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता.
21तुम्ही माझ्याविषयी निष्ठुर झाला आहात;
आणि आपल्या हाताच्या बळाने माझ्यावर वार करता.
22तुम्ही मला ओढून वार्यावर उडवून टाकता,
आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे.
23मला माहीत आहे की तुम्ही मी मरेपर्यंत खाली खेचणार आहात,
अशा ठिकाणी जे सर्व जीवितांसाठी नेमण्यात आले आहे.
24“पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो
तेव्हा खचितच कोणीही त्याला हात देत नाही.
25संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय?
गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय?
26तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले;
आणि मी प्रकाशाची वाट पाहिली, पण अंधकार आला.
27माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही;
क्लेशाचे दिवस माझ्याशी सामना करतात.
28मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे;
मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो.
29मी कोल्ह्यांचा भाऊ,
आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.
30माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे;
माझे शरीर तापाने फणफणत आहे.
31माझी वीणा रडण्याचे,
आणि माझा पावा शोकाचे स्वर काढते.