34
1मग एलीहू पुढे म्हणाला:
2“सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका;
विद्वानांनो, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका.
3कारण कानाला शब्दाची पारख आहे
जशी जिभेला अन्नाची चव आहे.
4आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या;
आणि जे उत्तम ते एकत्र शिकू या.
5“इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे,
परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.
6मी जरी अचूक आहे,
तरी मला लबाड ठरविले जाते;
मी जरी दोष विरहित आहे,
भरणार नाही अशा जखमांनी त्यांचे बाण मला घायाळ करतात.’
7इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय,
जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?
8तो दुष्टांची सोबत धरतो;
तो दुष्कर्म करणार्यांशी संबंध ठेवतो.
9कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात
काही लाभ नाही.’
10“तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका.
वाईट करणे हे परमेश्वरापासून
आणि अयोग्य करावे असे सर्वसमर्थापासून दूरच असो.
11ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात;
आणि त्यांच्या वर्तनास अनुरूप असे फळ त्यांना देतात.
12परमेश्वर चूक करतील,
किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे.
13त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले?
किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला?
14जर त्यांच्या मनास आले
आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,
15तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल
आणि मनुष्यप्राणी परत धुळीला जाऊन मिळेल.
16“तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका;
मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका.
17जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय?
जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?
18‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे,
आणि ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे सज्जनांना म्हणणारे परमेश्वरच नाही काय?
19जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही
आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही,
कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?
20मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो;
लोक डळमळतात आणि नाहीसे होतात;
मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात.
21“मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत;
परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.
22कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे,
जिथे दुष्कर्मी लपू शकतील.
23लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही,
जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.
24चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात
आणि त्यांच्या स्थानी दुसर्यास स्थापितात.
25कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात,
रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.
26आणि सर्व लोक पाहू शकतील
अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,
27कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत
आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.
28त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत
अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.
29परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल?
जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल?
तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,
30अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून
आणि लोकांसाठी जाळे टाकण्यापासून प्रतिबंध करता यावा.
31“समजा कोणी परमेश्वराला म्हटले,
‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.
32मी पाहू शकत नाही ते मला शिकवा;
मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’
33जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता
तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय?
मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे;
म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा.
34“बुद्धिमान मनुष्य जाहीर करतात,
ज्ञानी लोक जे माझे बोलणे ऐकतात ते म्हणतात,
35‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे;
त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’
36त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी
कारण तो दुष्टांप्रमाणे बोलत आहे!
37कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो;
आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो
आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”