YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 4

4
एलीफाज
1एलीफाज तेमानीने उत्तर दिले:
2“जर कोणी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू धीराने ऐकशील का?
परंतु बोलल्याशिवाय कोणाच्याने राहवेल?
3तू अनेक जणांना कसे शिकवलेस,
तू दुर्बल हात कशाप्रकारे सबळ केलेत याचा विचार कर.
4तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे;
आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस.
5परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास;
तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.
6तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय
आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?
7“विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का?
सज्जनांचा नाश झाला आहे का?
8मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात
आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.
9परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात;
त्यांच्या क्रोधाची केवळ एक फुंकर त्यांना नाहीसे करते.
10सिंह डरकाळी फोडतील आणि गर्जना करतील,
तरी त्या बलिष्ठ सिंहाचे दात मोडलेले आहेत.
11भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो,
आणि सिंहिणीची पिल्ले पांगून जातात.
12“गुप्तपणे मला वचन सांगण्यात आले,
माझ्या कानांनी त्याची कुजबुज ऐकली.
13रात्रीच्या अस्वस्थ स्वप्नात,
जेव्हा लोकांना गाढ झोप लागते,
14तेव्हा मी भयभीत झालो आणि घाबरून त्रस्त झालो
त्यामुळे माझी सर्व हाडे थरथरली.
15माझ्या मुखासमोरून एक आत्मा गेला,
आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
16तो थांबला,
परंतु काय आहे ते मात्र मला समजेना.
त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता,
आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले:
17‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय?
बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
18जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही,
जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,
19तर मग जे मातीच्या घरात राहतात,
ज्यांचा पाया धुळीत आहे,
जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?
20पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात;
कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात.
21त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून,
त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’

सध्या निवडलेले:

इय्योब 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन