2
राहाब आणि हेर
1त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले.
2तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” 3तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.”
4परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते. 5संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.” 6परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्याखाली लपविले होते. 7तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.
8रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली 9आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत. 10कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्या सीहोन व ओग या दोन अमोर्यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे. 11जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.
12“तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या, 13की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”
14“आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!”#2:14 म्हणजे तुझ्या संरक्षणासाठी आम्ही मरण पत्करण्यास तयार आहोत त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”
15तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते. 16ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”
17-18आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही. 19जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल. 20परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”
21“मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.”
तेव्हा तिने त्यांना पाठवून दिले आणि ते निघून गेले आणि तिने किरमिजी रंगाचा दोर तिच्या खिडकीला बांधला.
22जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले. 23नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. 24ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”