24
शेखेम येथे कराराचे नूतनीकरण
1नंतर यहोशुआने इस्राएलांच्या सर्व गोत्रांना शेखेम येथे एकत्र केले. त्याने इस्राएलचे वडीलजन, पुढारी, न्यायाधीश व सर्व अधिकाऱ्यांना बोलाविले आणि त्या सर्वांनी स्वतःस परमेश्वरासमोर सादर केले.
2यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘फार पूर्वी तुमचे पूर्वज, अब्राहाम व नाहोराचा पिता तेरह, फरात#24:2 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीच्या पलीकडे राहत होते आणि ते इतर दैवतांची भक्ती करीत होते. 3परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला, 4आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले.
5“ ‘नंतर मी मोशे आणि अहरोनला पाठविले आणि मी तिथे जे केले त्यामुळे इजिप्तच्या लोकांवर पीडा आल्या आणि मी तुम्हाला बाहेर आणले. 6जेव्हा मी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा तुम्ही समुद्राजवळ आला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि घोडेस्वार घेऊन तांबड्या समुद्रापर्यंत तुमचा पाठलाग केला. 7त्यांनी साहाय्यासाठी याहवेहचा (म्हणजे माझा) धावा केला आणि मी तुमच्या व इजिप्तच्या लोकांमध्ये अंधार केला, समुद्र इजिप्तच्या लोकांवर आणला आणि त्यात त्यांना बुडवून टाकले. मी इजिप्तच्या लोकांचे काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यानंतर तुम्ही पुष्कळ काळ अरण्यात राहिला.
8“ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्या अमोर्यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. 9जेव्हा सिप्पोरचा पुत्र, मोआबाचा राजा बालाकाने इस्राएलविरुद्ध युद्धाची तयारी केली आणि तुम्हाला शाप देण्यासाठी बौराचा पुत्र बलामाला पाठविले. 10परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले.
11“ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. 12मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही. 13म्हणून ज्या भूमीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी आणि जी शहरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हाला दिली; आणि तुम्ही त्यात राहता आणि जे तुम्ही लावले नाही त्या द्राक्षमळ्यातून व जैतुनाच्या बागेतून फळे खाता.’
14“तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा. 15परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”
16तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो! 17याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले. 18आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.”
19यहोशुआ लोकांना म्हणाला, “तुमच्याने याहवेहची सेवा करविणार नाही. ते पवित्र परमेश्वर आहे; ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. ते तुमच्या बंडाची आणि तुमच्या पातकांची क्षमा करणार नाही. 20जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.”
21परंतु लोक यहोशुआला म्हणाले, “नाही! आम्ही याहवेहचीच सेवा करणार.”
22तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, “तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात.”
त्यांनी उत्तर दिले. “होय, आम्ही साक्षीदार आहोत.”
23तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.”
24लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.”
25त्या दिवशी यहोशुआने इस्राएली लोकांशी एक करार केला, आणि शेखेम येथे त्याने त्यांच्यासाठी नियम आणि आज्ञा पुन्हा निश्चित करून घेतल्या. 26तेव्हा यहोशुआने या सर्व गोष्टींची नोंद परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात केली. नंतर त्याने एक मोठी धोंड घेतली आणि याहवेहच्या पवित्रस्थानाजवळ एला वृक्षाखाली ठेवली.
27नंतर यहोशुआ सर्व लोकांस म्हणाला, “पाहा, ही धोंड आपल्याविरुद्ध साक्ष असेल. याहवेह जे आपल्याशी बोलले तो प्रत्येक शब्द तिने ऐकला आहे. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराबरोबर खरेपणाने राहिला नाहीत तर ती तुमच्याविरुद्ध साक्ष देईल.”
28नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले.
यहोशुआला वचनदत्त देशात पुरतात
29या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. 30आणि त्यांनी त्याला गाश पर्वतांच्या उत्तरेला असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह#24:30 किंवा तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्याच वतनभागात पुरले.
31इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली.
32योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस#24:32 मूळ भाषेत केशिता, या नाण्याचे मूल्य व वजन अज्ञात आहे विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.
33अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.