10
नादाब व अबीहू यांचा मृत्यू
1अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते. 2म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले. 3तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे:
“ ‘जे माझ्याजवळ येतात
त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे;
सर्व लोकांसमक्ष
माझे गौरव होईल.’ ”
यावर अहरोन शांत राहिला.
4मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.” 5तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली.
6मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका#10:6 किंवा तुमचे डोके झाकलेले ठेवा व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील. 7सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले.
8मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली, 9“तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे, 10यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल. 11आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”
12अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे. 13ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे. 14परंतु अर्पण केलेला ऊर व समर्पित केलेली मांडी मात्र तुम्ही कोणत्याही विधिनियमानुसार शुद्ध केलेल्या जागी बसून खावी. इस्राएली लोकांनी अर्पिलेल्या शांत्यर्पणाचा हा भाग तुमचे पुत्र व कन्या यांच्यासाठी आहे. 15मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.”
16जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला. 17“तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे. 18पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानात आणले नव्हते, म्हणून माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही तो पवित्रस्थानात खावयाचा होता.”
19तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?” 20हे ऐकल्यावर मोशेचे समाधान झाले.