14
कुष्ठरोगापासून शुद्धता
1याहवेह मोशेला म्हणाले, 2कोणत्याही रोगग्रस्त व्यक्तीला त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीसमयी, जेव्हा त्यांना याजकाकडे आणले जाते तेव्हा हे नियम आहेत: 3याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी#14:3 कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी या शब्दाचा उपयोग केला जात असे. बरे झाले आहेत असे दिसून आले, 4याजक आज्ञा करतील की दोन जिवंत शुद्ध पक्षी आणि काही गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी आणि एजोब त्या व्यक्तीच्या शुद्धीकरणासाठी आणाव्यात. 5मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात त्यापैकी एक पक्षी मारावा; 6गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन दुसर्या जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात या सर्व वस्तू बुडवाव्यात. 7मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे.
8मग शुद्ध करण्यात येणार्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करावे व स्नान करावे; म्हणजे तो विधिनियमानुसार शुद्ध होईल. त्यानंतर त्याने छावणीत राहण्यासाठी परत यावे. तरी सात दिवसापर्यंत त्याने आपल्या तंबूबाहेरच राहावे. 9सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे. मग तो शुद्ध होईल.
10आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा#14:10 अंदाजे 5 कि.ग्रॅ. एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर#14:10 अंदाजे 0.3 लीटर तेल घेऊन यावे. 11मग शुद्ध जाहीर करणार्या याजकाने शुद्ध होणार्या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे.
12नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे. 13पवित्रस्थानात ज्या ठिकाणी पापार्पणाच्या व होमार्पणाच्या बलींचा वध करतात, त्या ठिकाणी याजकाने कोकराला ठार मारावे. पापार्पणातील बलीप्रमाणेच या दोषार्पणातील बली याजकाच्या हक्काचा आहे. हे परमपवित्र होय. 14मग याजकाने या दोषबलीचे काही रक्त घ्यावे आणि शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. 15मग याजकाने तेलाचा काही भाग घ्यावा आणि ते आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर ओतावे, 16व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे. 17यानंतर तळहातावर शिल्लक राहिलेले तेल याजकाने शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या पायाच्या व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे. 18याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.
19नंतर अशुद्धतेपासून शुद्ध झालेल्या माणसासाठी याजकाने पापबली अर्पावा व त्याच्यासाठी प्रायश्चित्ताचा विधी करावा; आणि यानंतर याजकाने होमबलीचा वध करावा, 20मग याजकाने अन्नार्पणासह, होमबली वेदीवर अर्पावा व त्या माणसासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो मनुष्य शुद्ध ठरेल.
21जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग#14:21 अंदाजे 1.6 कि.ग्रॅ आणावा, 22आणि ऐपतीप्रमाणे त्याने पारव्याची दोन पिल्ले किंवा दोन होले आणावे; त्यातील एक पापबली व दुसरा होमबली म्हणून अर्पण करावा.
23“प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत. 24मग याजकाने दोषार्पणाचे कोकरू व अर्धा लीटर तेल घेऊन वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी ओवाळावे. 25त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. 26मग याजकाने आपल्या डाव्या तळहातावर तेलातील काही तेल ओतावे, 27आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे. 28मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन ते शुद्ध होणार्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्याला दोषबलीचे रक्त लावले त्या जागी लावावे. 29याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे. 30मग त्या व्यक्तीला परवडेल त्याप्रमाणे त्याने पारव्याच्या किंवा होल्याच्या पिल्लाचे अर्पण करावे. 31एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.”
32हे नियम सर्वसाधारणपणे शुद्धीकरणासाठी लागणारे अर्पण आणण्याची ऐपत नसलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आहेत.
चट्ट्यापासून शुद्धीकरण
33याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, 34“जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन, 35तेव्हा त्या घराच्या मालकाने याजकाकडे येऊन त्याला सांगावे, ‘आमच्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसत आहे.’ 36याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी. 37त्याने घराच्या भिंतींची तपासणी करून त्यावरील चट्टा भिंतींपेक्षा खोलवर हिरवट किंवा लालसर आहे, असे याजकाला आढळले, 38तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे. 39मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल, 40तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. 41नंतर भिंतीचा आतील भाग पूर्णपणे खरवडून त्याची दगड व माती नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. 42मग त्या जागी बसविण्यासाठी दुसरे दगड आणावेत व नव्या चुन्याचा गिलावा करावा.”
43दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला, 44तर याजकाने आत येऊन तो तपासावा, आणि जर चट्टा पसरला आहे असे त्याला दिसून आले, तर तो न निघणारा कुष्ठरोग असून ते घर अशुद्ध झाले आहे. 45मग ते घर पाडून टाकण्यात यावे व त्या घराचे दगड, चुना, लाकूड नगराबाहेर नेऊन अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावे.
46असे घर बंद असता जो कोणी त्या घरात शिरेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील, 47जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी.
48याजकाने आत जाऊन घर पुन्हा तपासावे आणि गिलाव्यावर चट्टे पुनः दिसले नाहीत, तर ते घर शुद्ध झाले असून तेथील कुष्ठरोग नाहीसा झाला आहे असे त्याने जाहीर करावे. 49मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा. 50त्याने वाहत्या पाण्याच्या वर मातीचे पात्र धरून त्याच्यात एक पक्षी मारावे, 51-52व वाहत्या पाण्यावर धरलेल्या मातीच्या पात्रात मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात, तसेच वाहत्या पाण्यात, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी, एजोब त्याचप्रमाणे दुसरा जिवंत पक्षी बुडवावा, आणि ते रक्त सात वेळा त्या घरावर शिंपडावे. अशाप्रकारे याजक ते घर शुद्ध करेल. 53मग त्याने तो जिवंत पक्षी शहराबाहेर मोकळ्या जागी सोडून द्यावा. अशाप्रकारे त्याने घराकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे ते शुद्ध होईल.
54सर्व प्रकाराचा कुष्ठरोग, चाई, 55वस्त्रावरील आणि घरावरील कुष्ठरोग, 56सूज, खवंद, पांढरा चट्टा या सर्वांसंबंधीचा हा नियम आहे. 57अशाप्रकारे हा खरोखरच शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे तुम्हाला समजेल.
कुष्ठरोग आणि बुरशी यासाठी हे नियम दिलेले आहेत.