20
आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांना सांग: इस्राएली लोकांपैकी कोणीही किंवा तुमच्यात राहणाऱ्या कोणत्याही परदेश्याने त्याच्या मुलाचे अर्पण मोलख दैवतासाठी केले, तर समुदायातील सभासदांनी त्याला दगडमार करावा. 3मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे. 4पण जर त्या मनुष्याने आपले मूल मोलखला बळी दिले हे माहीत असूनही त्या समुदायाच्या लोकांनी त्याकडे डोळेझाक केली व बळी देणार्याला मारून टाकण्याचे नाकारले, 5मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन.
6“ ‘शकुनविद्या आणि चेटक्यांची अनुसरण करून स्वतःला वेश्या करण्याचा प्रयत्न करणार्यांकडून मी माझे मुख फिरवेन आणि मी त्याचा त्याच्या लोकांमधून उच्छेद करेन.
7“ ‘तुम्ही स्वतःस शुद्ध राखून पवित्र राहावे, कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. 8तुम्ही माझे नियम पाळा आणि त्याचे पालन करा. मी याहवेह आहे, जो तुम्हाला पवित्र करतो.
9“ ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला अवश्य जिवे मारावे, कारण त्याने स्वतःच्या आईवडिलांना शाप दिला आहे, त्याच्या रक्ताचा दोष त्याच्याच माथी राहील.
10“ ‘जर कोणी व्यक्ती दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—आपल्या शेजार्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो—त्या व्यभिचारी आणि व्यभिचारिणी दोघांनाही जिवे मारावे.
11“ ‘जो व्यक्ती आपल्या पित्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो, तो आपल्या पित्याचा अपमान करतो. त्या व्यक्तीला व त्या स्त्रीला अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच माथी राहील.
12“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
13“ ‘जर एखादा पुरुष जसे एखाद्या स्त्रीसोबत तसे दुसर्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवतो, तर त्या दोघांनीही घृणास्पद कृत्य केले आहे. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
14“ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे.
15“ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे.
16“ ‘जर एखादी स्त्री एखाद्या प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गेली तर ती स्त्री आणि तो प्राणी दोघांनाही मारून टाका. त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.
17“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील.
18“ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे.
19“ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल.
20“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील.
21“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील.
22“ ‘तुम्ही माझे विधी व नियम पाळले तर मी वस्ती करून राहण्यासाठी ज्या देशात तुम्हाला नेत आहे, ती भूमी तुम्हाला बाहेर ओकून देणार नाही. 23ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देत आहे, त्या राष्ट्रांचे रीतिरिवाज तुम्ही पाळू नयेत, कारण त्यांनी ही दुष्कर्मे केली म्हणून मला त्यांचा तिरस्कार आहे. 24परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
25“ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे. 26तुम्ही माझ्यासाठी पवित्र असावे, कारण मी याहवेह पवित्र आहे आणि तुम्ही माझे व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.
27“ ‘शकुनविद्या वा चेटूक करणारा पुरुष किंवा स्त्री यांना अवश्य जिवे मारावे. त्यांना दगडमार करावा. त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.’ ”