YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 22

22
1याहवेह मोशेला म्हणाले, 2“अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग की, इस्राएलच्या लोकांनी आणलेल्या पवित्र अर्पणांचा आदर करावा, म्हणजे ते माझ्या पवित्र नावाला अपवित्र करणार नाही. मी याहवेह आहे.
3“त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.
4“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल, 5किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल. 6अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये. 7सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे. 8मृत पावलेले किंवा जंगली प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस त्याने खाऊन अशुद्ध होऊ नये. मी याहवेह आहे.
9“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.
10“ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये. 11पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील. 12जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्‍यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत. 13पण जर याजकाची मुलगी विधवा किंवा पतीने सोडलेली असून तिला पुत्र नसेल आणि ती तरुणपणी पुन्हा आपल्या पित्याच्या घरात येऊन राहत असेल, तर मात्र तिने आपल्या पित्याच्या घरातील अन्न खावे. तथापि, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने#22:13 अनधिकृत व्यक्ती अर्थात् जो याजकीय कुटुंबातील नाही हे अन्न खाऊ नये.
14“ ‘एखाद्याने चुकून पवित्र अर्पणांतील काही पदार्थ खाल्ले, तर त्याने जितके पदार्थ खाल्ले असतील तितके सर्व आणि पाचव्या हिश्शाइतका पदार्थाचा भाग याजकाला द्यावा. 15इस्राएली लोकांनी याहवेहला अर्पिलेली पवित्र अर्पणे, याजकाने भ्रष्ट करू नयेत, 16ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ”
स्वीकृत नसलेले बलिदान
17याहवेह मोशेला म्हणाले, 18“अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले, 19तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्‍हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे. 20दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत. 21याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे. 22याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका. 23तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही. 24ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका. 25आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ”
26याहवेह मोशेला म्हणाले, 27“वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल. 28गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये.
29“ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा. 30त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे.
31“तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात; मी याहवेह आहे. 32माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले 33आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.”

सध्या निवडलेले:

लेवीय 22: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन