3
शांत्यर्पण
1“ ‘जर तुमचे अर्पण हे शांत्यर्पण असेल आणि तुम्ही कळपातील नर किंवा मादी प्राण्याचे अर्पण करीत असाल, तुम्ही निर्दोष असा प्राणी याहवेहसमोर आणावा. 2तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे. 3शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी, 4कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल. 5नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
6“ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा. 7जर तुम्ही कोकर्याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे, 8तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील. 9शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी, 10कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. 11याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.
12“ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे, 13तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील. 14जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी, 15कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. 16याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे.
17“ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ”