YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 24:1-53

लूक 24:1-53 MRCV

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या; तिथे त्यांनी पाहिले की तो दगड कबरेपासून दूर सरकवलेला आहे, परंतु जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना प्रभू येशूंचे शरीर सापडले नाही. याबद्दल ते आश्चर्य करीत असतानाच, अकस्मात त्यांच्या बाजूला विजेसारखी चकाकणारी वस्त्रे घातलेले दोन पुरुष उभे राहिले. त्यामुळे त्या स्त्रिया भयभीत झाल्या व खाली वाकून त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली. पण ते पुरुष त्यांना म्हणाले, “जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही मृतांमध्ये का शोधता? ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा. ‘मानवपुत्र दुष्ट लोकांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाईल, त्यांना क्रूसावर खिळून मारण्यात येईल आणि ते तिसर्‍या दिवशी पुन्हा उठतील.’ ” तेव्हा त्यांना त्यांचे शब्द आठवले. मग कबरेपासून परत येऊन त्यांनी येशूंच्या अकरा शिष्यांना आणि इतर सर्वांना हे वर्तमान सांगितले. ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या, त्यात मरीया मग्दालिया, योहान्ना, याकोबाची आई मरीया आणि इतर ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी हे प्रेषितांना सांगितले. परंतु त्यांनी त्या स्त्रियांवर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना त्यांचे शब्द मूर्खपणाचे वाटले. पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे सात मैल असलेल्या अम्माऊस नावाच्या गावी चालले होते. घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांबरोबर बोलत होते. ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तिथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते. येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले. त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?” “कशा घटना?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता. महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्‍यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले. परंतु आम्हाला आशा होती की तोच इस्राएलास मुक्ती देणारा होता. या सर्वगोष्टी घडून आज तीन दिवस झाले आहेत. पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या. पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत. तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात. आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?” नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले. जेव्हा ते त्या गावाजवळ आले जिथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले. परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले. ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले. ते एकमेकास म्हणू लागले, “ते रस्त्याने आपल्यासोबत बोलत असताना आणि आपल्याला शास्त्रलेख समजावून सांगत असताना आपली अंतःकरणे प्रज्वलित झाली नाहीत काय?” तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले, तिथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.” तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले. ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.” आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले. येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला? माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.” हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले. त्यावेळी त्यांची हृदये आनंदाने भरली, पण त्याबरोबरच त्यांच्या मनात संशयही दाटला होता. तेव्हा येशूंनी त्यांना विचारले, “तुमच्याजवळ येथे खावयास काही आहे काय?” तेव्हा त्यांनी त्यांना भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला. त्यांनी तो घेऊन त्यांच्यादेखत खाल्ला. मग येशू त्यांना म्हणाले, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहितेमध्ये जे काही माझ्याविषयी लिहिले आहे ते सर्व खरे झालेच पाहिजे, हे मी तुम्हाला तुमच्याबरोबर असताना सांगितले होते.” मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली. त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्‍या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या. आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी. तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षी आहात. माझ्या पित्याने अभिवचन दिले ते मी तुम्हाकडे पाठवेन. तर तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.” यानंतर येशूंनी त्यांना बेथानी गावापर्यंत नेले आणि आपले हात वर करून आशीर्वाद दिला. येशू त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांना सोडून स्वर्गात वर घेतले गेले. तेव्हा त्यांनी त्यांना नमन केले आणि मोठ्या आनंदाने ते यरुशलेमास परतले आणि ते मंदिरामध्ये नियमितपणे परमेश्वराची स्तुती करीत राहिले.