YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26

26
येशूंविरुद्ध कट
1आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, 2“जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण#26:2 वल्हांडण इजिप्त देशातल्या 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवस खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत. आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिले जातील.”
3नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडील, कयफा नावाचा महायाजक याच्या राजवाड्यात एकत्र जमले. 4आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते. 5पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
येशूंना बेथानी येथे तैलाभ्यंग
6येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते. 7तेथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते तेल येशूंच्या मस्तकांवर, ते बसले असताना ओतले.
8जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. “का ही तेलाची नासाडी?” ते म्हणाले, 9“हे तेल अधिक किमतीस विकून आलेले पैसे गोरगरिबांना दान करता आले असते.”
10हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 11गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील,#26:11 अनु 15:11 परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. 12माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे. 13मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जेथे कोठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तेथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
यहूदा येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास तयार होतो
14यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदा इस्कर्योत; प्रमुख याजकांकडे गेला. 15आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली. 16त्या वेळेपासून यहूदा येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
शेवटचे भोजन
17बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी?”
18येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करीन.’ ” 19येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर बसले होते. 21आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”
22येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखित झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभुजी, खरोखर तो मी तर नाही ना?”
23येशूंनी उत्तर दिले, “ज्या एकाने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच माझा विश्वासघात करणार आहे. 24कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
25मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, खरोखर तो मी तर नाही ना?”
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”
26भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”
27त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या; 28हे माझ्या कराराचे रक्त#26:28 काही मूळप्रतींमध्ये नवा करार आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे. 29मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
30मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.
पेत्र येशूंना नाकारतो याविषयीचे येशूंचे भविष्य
31मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की:
“ ‘मी मेंढपाळावर प्रहार करीन,
आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’#26:31 जख 13:7
32परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटेन.”
33यावर पेत्राने त्याला म्हटले, “प्रत्येकजण सोडून गेला, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”
34येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
35परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले.
गेथशेमाने
36मग येशू त्यांच्या सर्व शिष्यांसोबत गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले, आणि त्यांना ते म्हणाले, “मी पुढे जाऊन प्रार्थना करून येईपर्यंत येथे बसा.” 37मग त्यांनी पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र, याकोब व योहान, यांना बरोबर घेतले आणि ते अस्वस्थ आणि दुःखीकष्टी होऊ लागले. 38ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”
39मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”
40यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “माझ्याबरोबर तुम्हा माणसांना एक तासभरही जागे राहता आले नाही का?” 41येशू त्यांना म्हणाले “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे.”
42येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली की, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”
43नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. 44म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.
45नंतर ते शिष्यांकडे परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पाहा, वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. 46उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
येशूंना अटक
47येशू बोलत आहे तोच, यहूदा, त्यांच्या बारा पैकी एक, तेथे पोहोचला. त्याच्याबरोबर मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला, जो प्रमुख याजक आणि वडीलजनांनी पाठविलेला होता. 48आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.” 49तत्क्षणी यहूदा येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.
50येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.”
मग लोकांनी येशूंना धरले आणि अटक केली. 51तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासाचा कान कापून टाकला.
52तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील. 53मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाही का? 54पण मी तशी विनंती केली, तर जे घडत आहे त्याविषयीचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?”
55त्यावेळी येशू जमावाला म्हणाले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, जे तुम्ही तरवार आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात बसून शिक्षण देत होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. 56यासाठी की संदेष्ट्यांनी धर्मशास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठीच हे सर्व घडत आहे.” मग सर्व शिष्य त्यांना एकट्याला सोडून पळून गेले.
सन्हेद्रीन सभेपुढे येशू
57येशूंना अटक करून त्यांना प्रमुख याजक कयफा याच्याकडे नेले; त्याठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते. 58पेत्र काही अंतरावरुन त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि पहारेकर्‍यांमध्ये जाऊन काय होते ते पाहत बसला.
59मुख्य याजक, आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते. 60परंतु ते त्यांना सापडले नाही जरी अनेक खोटे साक्षीदार पुढे आले.
शेवटी दोन माणसे पुढे आली, 61“हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”
62हे ऐकून प्रमुख याजक उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहे ती काय आहे?” 63पण येशू शांत राहिले.
नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, तू पुत्र परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त आहेस का?”
64येशूंनी उत्तर दिले, “असे तू म्हणतोस, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून#26:64 स्तोत्र 110:1; दानी 7:13 मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”
65येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. 66तुम्हाला काय वाटते?”
“तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले.
67मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपडाका मारल्या, 68आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?”
पेत्र येशूंना नाकारतो
69हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”
70परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”
71मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तेथे त्याला दुसर्‍या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा माणूस नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
72या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मला त्या माणसाची ओळख नाही!”
73थोड्या वेळाने जी माणसे तेथे उभी होती. ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या बोलण्यावरून आम्ही हे सांगू शकतो.”
74हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.”
तेवढ्यात कोंबडा आरवला. 75तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.

सध्या निवडलेले:

मत्तय 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन