YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10

10
घटस्फोट
1येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले.
2काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”
3त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?”
4ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”
5येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. 6परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’#10:6 उत्प 1:27 असे निर्माण केले. 7‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,#10:7 काही जुन्या प्रतींमध्ये आढळत नाही आई आणि वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील 8आणि ते दोघे एकदेह होतील.’#10:8 उत्प 2:24 म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. 9म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
10नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. 11त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. 12आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”
लहान बालके व येशू
13लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. 14जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 15मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” 16नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
श्रीमंत आणि परमेश्वराचे राज्य
17येशू वाटेला लागणार तोच, एक मनुष्य त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून त्यांना म्हणाला, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”
18येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. 19तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.#10:19 निर्ग 20:12‑16; अनु 5:16‑20’ ”
20“गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.”
21येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
22यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.
23येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!”
24हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे.#10:24 काही मूळ प्रतींनुसार जे धनावर भरवसा करतात त्यांच्यासाठी 25श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
26शिष्य आणखी चकित झाले व ते एकमेकास म्हणू लागले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
27येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही; परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
28पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”
29येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे. 30या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्‍या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”
येशू आपल्या मरणाचे तिसर्‍यावेळी भविष्य करतात
32ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले. 33“आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील. 34ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”
याकोब व योहान यांची विनंती
35नंतर जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान येशूंकडे आले. “गुरुजी,” ते म्हणाले, “आम्ही आपल्याजवळ जे काही मागतो, ते आपण आमच्यासाठी करावे.”
36“मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” येशूंनी विचारले.
37ते म्हणाले, “आपण आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे.”
38“तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही,” येशू म्हणाले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही पिऊ शकाल काय किंवा ज्या बाप्तिस्माने मी बाप्तिस्मा पावलो आहे तो बाप्तिस्मा तुम्ही घेऊ शकाल का?”
39ते उत्तरले, “आम्ही तो पिऊ शकू.”
येशूंनी त्यांना म्हटले, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल खरा आणि जो बाप्तिस्मा मला दिला आहे तो बाप्तिस्मा तुम्हीही घ्याल. 40परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा ज्यांच्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्यांनाच त्या मिळतील.”
41हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा ते याकोब आणि योहानवर रागावले. 42येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदीयांवर शासन करणारे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. 43पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, तो सर्वांचा गुलाम झाला पाहिजे. 45मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीलाभ
46मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. 47जेव्हा हे नासरेथकर येशू जात आहेत असे त्याने ऐकले, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
48अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
49येशू थांबले आणि म्हणाले, “त्याला इकडे बोलवा.”
त्याप्रमाणे लोक त्या आंधळ्या मनुष्याला म्हणाले, “धीर धर, आपल्या पायांवर उभा राहा, ते तुला बोलावत आहेत.” 50हे ऐकताच बार्तीमयने आपला अंगरखा भिरकावून दिला, उडी मारून तो उठला आणि येशूंकडे आला.
51“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले.
आंधळा मनुष्य म्हणाला, “गुरुजी मला दृष्टी यावी.”
52येशू म्हणाले, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि तो रस्त्याने येशूंच्या मागे चालू लागला.

सध्या निवडलेले:

मार्क 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन