1
यरुशलेमसाठी नहेम्याहची प्रार्थना
1हखल्याहचा पुत्र नहेम्याहची वचने:
विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात असताना,#1:1 पर्शियाचा राजा अर्तहशश्त याच्या कारकिर्दीच्या 2माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली.
3त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.”
4हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो. 5मग मी म्हणालो:
“हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता, 6तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो. 7आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही.
8“तुम्ही मोशेला काय सांगितले होते याची कृपा करून आठवण करा. तुम्ही म्हटले होते, ‘जर तुम्ही अविश्वासू व्हाल, तर मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन; 9पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’
10“ते तुमचेच सेवक व लोक आहेत, ज्यांना तुम्ही आपल्या महान शक्तीने व समर्थ हाताने सोडविले आहे. 11हे प्रभू, कृपा करून माझ्या प्रार्थनेकडे व जे तुमच्या नामाचा सन्मान करण्यात आनंद मानतात, त्यांची प्रार्थना ऐका. मी राजाकडे एका मोठ्या कृपेची मागणी करण्यासाठी जात आहे; आता कृपा करून या मनुष्याच्या सानिध्यात माझ्याविषयी दया निर्माण होण्यासाठी मला यश द्या.”
मी राजाचा प्यालेबरदार होतो.