10
चांदीचे कर्णे
1याहवेह मोशेला म्हणाले: 2“तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर. 3दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे. 4जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे. 5जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे. 6दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील 7जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.
8“अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा. 9जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल. 10तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
इस्राएली लोक सीनाय सोडतात
11दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला. 12तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले. 13याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार ते पहिल्या प्रवासास निघाले.
14यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता. 15सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता, 16आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता. 17मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले.
18त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता. 19सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता. 20आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता. 21मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.
22एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता. 23पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता, 24आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता.
25शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता. 26ओक्रानाचा पुत्र पगीयेल हा आशेर वंशाच्या दलावर होता, 27आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता. 28पुढे निघताना इस्राएली दलांच्या प्रवासाचा हा क्रम होता.
29आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.”
30तो त्याला म्हणाला, “नाही, मी येणार नाही; मी माझा देश आणि माझ्या लोकांकडे जात आहे.”
31पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू. 32तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”
33मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला. 34ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता.
35जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे,
“हे याहवेह, सक्रिय व्हा!
तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो;
तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.”
36जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे,
“हे याहवेह, परत या,
इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”