ओबद्याह 1
1
ओबद्याहचा दृष्टान्त
1ओबद्याहचा दृष्टान्त हा.
एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात;
आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला:
राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता,
“उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”
2“पाहा, राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन;
तुझा पूर्णपणे तिरस्कार करण्यात येईल.
3तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे,
तुम्ही जे खडकांच्या#1:3 किंवा सेलाच्या कपारींमध्ये कपारीत राहता
आणि तुमचे घर उंचावर बांधता,
तुम्ही जे स्वतःला म्हणता,
‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’
4तू गरुडांप्रमाणे उंच भरार्या मारीत असलास
किंवा आपले घरटे तार्यांमध्ये बांधत असलास,
तरी तिथून मी तुला खाली आणेन,”
असे याहवेह जाहीर करतात.
5“जरी तुमच्याकडे चोर आले,
जरी रात्री लुटारू आले तर
पाहा, संकट कसे तुमची वाट पाहत आहे!
त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय?
जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले,
तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय?
6परंतु एसावला लुटण्यात येईल,
आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल!
7तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील;
तुझे मित्र तुला फसवतील आणि तुझा ताबा घेतील;
जे तुझी भाकरी खातात, तेच तुझ्यासाठी सापळा रचतील,
परंतु तुला ते कळणारही नाही.”
8याहवेह असे जाहीर करतात,
“त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा,
एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय?
9तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील,
आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण
कापला जाईल.
10तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे,
तू लाजेने झाकून जाशील;
आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.
11अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली
त्या दिवशी तू अलिप्त राहिला
आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले
आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या,
तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास.
12आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी
त्याच्याबद्दल आनंद करू नकोस,
किंवा यहूदीयाच्या रहिवाशांवर
आनंद मानू नकोस,
त्यांच्या संकटाच्या दिवशी
अधिक गर्व करू नकोस.
13तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी
माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका,
किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी
त्यावर आनंद करू नका,
किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी.
त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका.
14त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी
चौकात उभा राहू नको
किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी
त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको.
15“सर्व राष्ट्रांसाठी
नेमलेला याहवेहचा दिवस जवळ आला आहे.
जसे तू केलेस, तसे तुझ्यासोबतही केले जाईल होईल;
तुझ्याद्वारे करण्यात आलेली दुष्कर्मे तुझ्याच माथ्यावर उलटतील.
16जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला,
तसेच सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील;
ते पितील आणि पीत राहतील
आणि जसे ते कधीच नव्हते तसे बनतील.
17पण सीयोन पर्वतावर तारण होईल;
ते पवित्र होईल,
आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.
18याकोब अग्नीसारखा
आणि योसेफ ज्वालासारखे असतील;
एसाव उरलेल्या भुशासारखे होतील,
आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील.
एसावच्या वंशजांपैकी
कोणीही जिवंत राहणार नाही.”
याहवेहने हे म्हटले आहे.
19एसावाचा पर्वत
दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील,
आणि पलिष्टी लोकांच्या देशाला
डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील.
ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील
आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.
20बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे,
तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील;
यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत,
ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील.
21सुटका करणारे एसाव पर्वतावर
राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील.
आणि ते याहवेहचे राज्य असेल.
सध्या निवडलेले:
ओबद्याह 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.