1
नीतिसूत्रांचा उद्देश व विषय
1इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:
2सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी;
अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी;
3समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी,
जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी;
4जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी,
तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी—
5शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे,
आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे—
6ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा,
प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील.
7याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
परंतु मूर्ख#1:7 किंवा अनैतिक माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात.
प्रस्तावना: ज्ञान संपादन करण्यासाठी केलेला उपदेश
पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान
8माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
9ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे
आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
10माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील,
तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.
11जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये;
आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू,
चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;
12चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू,
आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;
13आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल
आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;
14आमच्याबरोबर चिठ्ठी टाक;
लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—
15माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस,
तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;
16कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात,
ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.
17जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!
18ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात;
ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात!
19गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात,
त्या सर्वांचे हे मार्ग आहेत;
असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते.
ज्ञानाचे आव्हान
20बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते#1:20 ज्ञानाला स्त्रीची उपमा दिली आहे.
भर चौकात ती तिचा आवाज उंचावते;
21भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते
शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते:
22“अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार?
कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार
आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार?
23मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा!
तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन,
तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.
24परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले,
आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.
25कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही.
आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,
26यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन;
जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—
27जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल,
जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल,
जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.
28“तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही;
ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,
29कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला,
आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.
30ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत;
आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,
31त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल,
आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.
32कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल,
आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल;
33परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील,
आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”